Thursday, May 26, 2011

बंधन - Ch 5


संध्याकाळची आता रात्र होत आली होती. सविता आतल्या खोलीत अभ्यास करत बसली होती. आईने जेवण बनवले होते पण अविनाशने ते खालले नाही. आई ही जेवली नाही. दोघे उपाशीच होते. आईने अंथरून टाकून दिले, अविनाश त्यावर पालथा पडला होता, परंतु त्याला झोपच येत नव्हती. सर्व अंग दुखत होते, कुठे वळ उठले होते तर कुठे खरचटले होते. अचानक त्याला उघड्या पाठीवर कसला तरी  गरम स्पर्श जाणवला, त्याने वळून बघितले. आई गरम गरम आंबी हळद आपल्या थरथरत्या हाताने अविनाशच्या जखमांवर लावत होती. हळद लावता लावता तिचे डोळे अश्रू ढाळत होते. तिचे सुजलेले डोळे बघून अविनाशला गहिवरून आले, तोही रडायला लागला.अविनाशचे रडणे ऐकून सविता धावत बाहेर आली.

"नको रडू बाळा, मी तुला मारले न, माझे हात तुटून का नाही पडले त्यावेळी?" असे म्हणत आई पुन्हा रडू लागली. ते दृश्य पाहून साविताही अश्रू ढाळू लागली. आई पुढे म्हणाली,"अवि बाळा मी तुला मारले, कारण तुझाबद्दल कोणी वाईट बोललेले मी ऐकू शकत नाही."
"आई तु रडू नकोस ना मी पुन्हा असं नाही करणार", अविनाश आईचे डोळे आपल्या नाजूक हाताने पुसू लागला. आई हातातील वाटीतून गरम आंबी हळद पुन्हा अविनाशच्या जखमांवर लावू लागली.

"आई ग!" जखमांची कळ न सोसून अविनाश जोरात ओरडला.

"काय झाले रे बाळा?" सोफ्यावर बसलेल्या निर्मलाबाई अविनाशला म्हणाल्या. आईच्या आवाजाने अविनाश भानावर आले. अविनाशच्या जुन्या आठवणी एवढ्या ताज्या होत्या की जणू ते सर्व काही वर्तमान काळातच घडत होते. अविनाशने ती कळ आतासुद्धा अनुभवली होती अन त्यामुळेच त्यांच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली.

"काही नाही आई, पायाला मुंगी चावली वाटते." त्यांनी आईकडे पाहिले. त्यावेळच्या आईत अन आताच्या आईत फारच फरक पडला होता. आईचे केस पिकले होते. डोळ्याला भिंगाचा चष्मा लागला होता. चेहऱ्यावर, हातावर सुरकुत्या दिसून येत होत्या. पूर्ण शरीरावर म्हातारपणाची लक्षणे दिसत होती. आई हातात रुद्राक्षाची माळा घेऊन सोफ्यावर बसली होती. ती नेहमी आता जपतप, देवपूजा इ. मधेच स्वतःला रममाण करत असे.

No comments: