साट!! त्या आवाजाने खोलीत क्षणभर शांतता पसरली.निर्मलाबाईनी अविनाशच्या कानशिला खाली एक जोरात लगावून दिली होती. अविनाश त्या फटक्यामुळे बाजूच्या स्टुलावर कोलमडत जाऊन पडला.
"सुलेखाताई, तुम्ही अरुणला घेवून डॉक्टर जोश्यांकडे चला मी ही येतेच तुमच्या सोबत दार लावून."
"त्याची काही गरज नाही मी नेईन अरुणला डॉक्टरांकडे पण तुम्ही जरा अविनाशला काबूत ठेवा. आज माझ्या पोराला मारले आहे उद्या कोणाचा खून करायलाही मागे पुढे पाहणार नाही तुमचा पोरगा." सुलेखाबाई मानेला हिसका देत निघून गेल्या, पण त्यांच्या शब्दांनी निर्मलाबाईचे हृदय वेधून टाकले. त्यांच्या हृदयाला सुलेखाताईचे शब्द्वेधी बाण टोचत होते.
निर्मलाबाईनी दार ओढून घेतले अन त्या आतील खोलीत गेल्या. दोनच मिनिटात त्या परत बाहेर आल्या, त्यांच्या हातात चामड्याचा पट्टा होता, सैनिकी पट्टा. अविनाश भीतीने कोपऱ्यात जावून बसला होता.
"माऱ्यामाऱ्या करतोस, गुंड बनायचे आहे तुला?" असे म्हणत आईने पट्टा वर उगारला. दुसऱ्याच क्षणी तो खाली आला अन पहिला फटका अविनाशच्या उजव्या हातावर व मांडीवर पडला. अविनाश जोरात कळवळू लागला. त्याच्या तोंडातून अस्फुटशी किंचाळी बाहेर पडली. "आई ग!"
दुसरा फटका त्याच्या उजव्या पोटरीवर पडला, तसा अविनाश मोठमोठ्याने रडू लागला. रडत रडत तो आईला विनवू लागला. "आई मारू नको ना."
"मारू नको तर काय पूजा करू तुझी? तुझा बाप देशाची सेवा करता करता तो बघ फोटोत जाऊन बसलाय अन तू त्यांच्या नावाला बट्टा लावायला निघालास.", तिसरा फटका अविनाशच्या उजव्या खांद्यावर व मानेवर पडला. अविनाश हुंदके देवून रडत होता.
चवथा, पाचवा, सहावा .... असे बरोबर सतरा फटके अविनाशला पडले होते, आता त्याचे वळ ही उमटायला लागले होते. अजून अविनाश हुंदके देऊन रडतच होता.
क्रमशः
आधीचे पान / पुढचे पान
No comments:
Post a Comment