ब्लॉगबाबत


                                                नमस्कार. आपण सर्व वाचकांचे माझ्या या ब्लॉगवर स्वागत आहे.

मी स्वप्निल पवार, तसा व्यवसायिक दृष्ट्या बघितले तर मी एक सॉफ्टवेअर डेव्हलोपर आहे. या इंटरनेटच्या दुनियेत मला कॅप्टन क्रंक या नावाने ओळखतात. कधी काळी इथीकल हॅकींग करत असताना माझ्या सहकाऱ्यांनी मला हे नाव दिले होते.

वाचण्याची आवड तशी मला लहानपणापासुनच होती. कृष्णाच्या, बलरामच्या, महाभारताच्या कथा वाचत मी मोठा झालो. इतिहास हा माझा सर्वात जवळचा मित्र त्यानेच मला साहित्याची गोडी लावली. मोठा होत असताना भरपुर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके हाती आली. वडिल कामगार कल्याण केंद्राचे संचालक होते, अन त्यांच्यामुळे कल्याण केंद्रातील वाचनालयाची सदस्यता मोफत मिळाली. इथेच मला रहस्यकथा, भयकथा, प्रेमकथा यांच्या कादंबऱ्या, काव्यसंग्रह वाचावयास मिळाले. अशा वातावरणात कधी लिहण्याची आवड निर्माण झाली हे कळलेच नाही.

एकदा कामगार कल्याण केंद्राद्वारे ललित कला काव्य, निबंध लेखन, नाटक, चित्रकला अशा स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. त्यात मी भाग घेतला होता, पहिला क्रमांक तर नाही आला पण उत्कृष्ट लेखनासाठी मला मान्यवरांकडुन भेट म्हणुन दोन पुस्तके मिळाली, एक होते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जिवनावर आधारीत, तर दुसरे होते एक काव्यसंग्रह. याप्रसंगाने माझ्यातील लेखकाला म्हणा किंवा वाचकाला म्हणा लिहीण्याचे बळ दिले.

खुप वर्षांपासुन सॉफ्टवेअर डेव्हलोपरच्या हृद्यात बंदिस्त असलेल्या लेखकाला मी या ब्लॉगद्वारे मोकळे स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करीत आहे. ह्या ब्लॉगवर मी वेगवेगळ्या विषयांवर आधारीत कथा आपल्या वाचनासाठी प्रस्तुत करीत आहे, तरीही या कथा तुम्हाला आवडतील अशी आशा करतो.

वाचक रसिकांच्या आंनदासाठी सदा प्रयत्नशील राहीन व निरनिराळ्या मनोरंजक कथा घेऊन साहित्यसेवा करेन अशी मी वाचकांस हमी देतो.

(काही कारणास्तव मी जवळ-जवळ २-३ वर्षे ह्या ब्लॉगवर कथा टाकू शकलो नाही. कारणच तसे होते, माझ्या जीवनाशी निगडित, मृत्यूचं दार ठोठावून मी परत आलो म्हणा किंवा माझ्या शुभ-चिंतकांच्या प्रार्थनेने म्हणा मी जिवंत आहे. जीवनात खूपच उलथा-पालथ झाली. जीवनाच्या या प्रवासात जीवलगांनी साथ सोडली, तर काहींनी जीवन प्रवासच संपवला. काही तर प्रत्यक्षात माझ्यावरच आरोप करून मोकळे झाले - ते म्हणतात ना उलटा चोर कोतवाल को डांटे - तसेच काहीसे. अन्याय माझ्यावर झाला, माझ्याशी दगाबाजी केली, दुसऱ्याशी सोयरीक जुळवली, तिसऱ्याला तर कवेतच घेतलं... असो, तर म्हणायचा उद्देश असा की जीवनात खूप उतार चढाव पाहिले. कधी डिप्रेशन मध्ये होतो, कधी मृत्यूशी झगडत होतो. कधी भावनाहीन झालो, तर कधी ढसाढसा रडलो ही....

तर लाईफ अशी असते, बरंच काही शिकायला मिळालं. पण पुन्हा साहित्याकडे वळलो आहे.. इथेच सुख आहे, माझी व्यथा, माझे दुःख, माझे आनंदाचे क्षण, माझी घालमेल, माझे अनुभव, व माझ्या काल्पनिक कथा... सर्व काही इथेच मांडणार आहे... तरी ही माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी व न टाकलेल्या पोस्ट साठी मी दिलगीर आहे... क्षमस्व)      

आपलाच...