Sunday, May 29, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch १. क्रोकोडाइल रिवर

द एलिअन टेक्नोलॉजी - ch १. क्रोकोडाइल रिवर

सकाळचे साडे तीन वाजले, बाहेर अजूनही काळोख होता. आकाशात चांदण्या टीम-टीम करत होत्या. काळोखाचे भयाण साम्राज्य सगळीकडे पसरलेले होते. कुठे  रातकिड्यांची किरकिर तर कुठे बेडकांचा डराव-डराव असा आवाज तर मध्येच कोल्हेकुई ऐकू येत होती. वारा जोरात वाहत होता अन त्यामुळे झाडा-झुडुपांची होणारी सळसळ वातावरणाची भयानकता अजूनच वाढवत होती. अशा वातावरणात ते घर शांतचित्ताने टेकडीच्या पायथ्याशी ऐटीत उभे होते.

ते घर नव्हे तर एक फारच सुंदर ओल्ड कॉटेज होते. त्या घराशेजारी एकही घर नव्हते, होती तर बस्स शांतता. बहुदा अशा शांत वातावरणाचा आनंद घेण्यासाठीच ते घर बांधले गेले असावे. घराच्या उजव्या बाजूस घरालगतच एक जुनाट तबेला होता. डाव्या बाजूस २ किलोमीटर अंतरावर एक छोटे तळे होते. पुढील भागात बेबी कॉर्नची पिके दाटीवाटीने उभी होती तर मागील बाजूस ती उंच - उंच टेकडी दिसून येत होती. अश्या त्या छोट्याश्या सुंदर घरास चहू बाजूने हिरवळीने वेधले होते अन त्यामुळे त्या घराची शोभा अजूनच वाढली होती.

खरेतर ते घर डॉ. फ्रांक्लीन जोन्स ( Franklin Jones ) यांचे होते. पूर्वायुष्यात जोन्स एक प्रख्यात वैज्ञानिक ( Scientist ) होते. त्याकाळी त्यांचा मानवाच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवू शकणारा प्रयोग चालू होता. ते ज्या प्रोजेक्टवर काम करत होते तो प्रोजेक्ट वैज्ञानिक दृष्ट्या फारच महत्वाचा होता. प्रोजेक्टसाठी स्पोन्सर अमेरिकेतील विविध मोठमोठाल्या कंपन्या करीत होत्या. दोन वर्षे काम करूनही डॉ जोन्सना हवी अशी सफलता हाती आली नव्हती. हळूहळू कंपन्यानी आपला हात मागे खेचून घेतला. स्पोन्सर्स अभावी प्रोजेक्ट बंद पडला. ह्या प्रोजेक्ट साठी डॉ जोन्संनी आपला अमूल्य वेळ दिला होता. या प्रसंगाने डॉ जोन्स पार खचून गेले, त्यांचा आत्मविश्वास आता कुठेतरी हरवून गेला होता. डॉ जोन्सने आपले सर्वस्व विकून आपला बस्ता न्यू योर्क मधून या इथे, कॅनडातील पूर्व भागातील या घरात हलवला.

घर तसे फारच सुंदर होते, परंतु वस्तीपासून खूप दूर होते, जवळपास  ७ मैल दूर. इथे येताना रस्त्यात लागणारी  क्रोकोडाइल रिवर पार करावी लागे, अर्थातच रिवर पार करण्यासाठी त्यावर एक पूल बांधला होता. तसं इथे चालत पोहचणे शक्यच नव्हते अन गाडीने येणे हि सोपे नव्हते. त्या पुलावरून गाडी चालवताना फार सांभाळून चालवावी लागे. एक तर जुनाट लाकडी पूल, वरून रिवर मध्ये मोठमोठ्या क्रोकोडाइल्सचा सूळसुळाट होता. कदाचित म्हणूनच त्या रिवरला  'क्रोकोडाइल रिवर' असे म्हणत असत.

क्रमशः 


1 comment:

Captain Crunk [AKA Swapnil R. Pawar] said...

Please guys, leave your comments here. it will help me to improve my writing skill.