Wednesday, May 25, 2011

बंधन - Ch 3



कदाचित भूतकाळातील आठवणी ताज्या झाल्या असाव्यात. हो नक्कीच ते भूतकाळात गुरफटून गेले होते, त्यांना आपल्या शालेय जीवन आठवू लागले. अश्याच एका संध्याकाळी छोटा अविनाश क्रिकेट खेळून घरी परतला होता. अंगातील पांढरा शर्ट मातीने मळलेला, ठीक-ठिकाणी फाटलेला होता. हातावर कोणीतरी ओरबाडल्याचे वळ पडले होते. खाकी चड्डीचे बट्टन तुटले होते, कसेबसे कमरेतील कर्गुड्याने तिचे ओझे सहन करीत तिला कमरेतून खाली गळण्यापासून वाचवले होते. अविनाशने चाळीतील बदक्याला बेदम चोपले होते.

"हे घ्या तुमचा इस्पेशल चाय, कोरा चहा! बिन दुधाचा ", मंदाच्या त्या आवाजाने अविनाश भूतकाळातील जगातून वर्तमान काळात आले.
"मी जरा बाजूच्या सुनंदा वहिनींच्या घरी जावून येते. प्रिया घरी आली आहे परत, बिचारी पोर, एक महिना नाही झाला लग्नाला नि हे अस्स घडलंय. तिला पांढऱ्यासाडीत कसे बगवेल मला, मला ती पोरीसारखीच आहे." 
मंदा शेजारच्या कुलकर्ण्यांच्या घरी निघून गेली. जाताना तिने कड्या शब्दात बजावले होते, "मुले घरी आली की त्यांना अभ्यासाला बसवा, मी घरी आले की मला ती अभ्यास करताना दिसली पाहिजेत,जरा लक्ष्य द्या त्यांच्याकडे. " 

अविनाश चहाचा घोट घेत मैदानात खेळणाऱ्या मुलाकडे पाहात होते. त्यांची भावनांची बोट त्यांना पुन्हा भूतकाळाच्या बेटावर सोडून गेली.

अविनाश मळक्या, ठीक - ठिकाणी फाटलेल्या कपड्यांनी घरी आला होता. आईने विचारले, "अवि काय झाले बाळ? हे मळके कपडे?? आणि जागोजागी फाटलेत कसे रे ?"

अविनाश काही सांगणार तोच आवाज आला,"तो काय सांगणार मी सांगते ना!". दारात सुलेखाकाकू अवतरल्या होत्या, त्यांच्या मागे बदक्या भीत-भीत उभा होता. त्याची ही अवस्था अविनाश सारखीच होती.त्याचे नाक फुटले होते, नाकातून रक्त वाहून शर्टावर त्याचे डाग उमटले होते. डावा डोळा सुजलेला होता.

"वहिनी, तुमच्या अविनाशने आमच्या अरुणला खूप मारले आहे, हे पहा त्याचा डोळा कसा सुजलाय, नाकातून भळाभळा रक्त वाहून गेलंय." बदक्याला पुढे करत त्या म्हणाल्या.

No comments: