"अविनाश आलास का रे बाबा?", निर्मलाबाई आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाल्या,"माझ्या गोळ्या आणल्यास का रे?"
"हो आई, आणल्यात गोळ्या पण एक गोळी राहिली." अविनाश खालच्या सुरात बोलले.
"का रे?"
"आई Chemist कडे हि गोळी नव्हती, दोन दिवसांनी मिळेल म्हणाला"अविनाश आईच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले.
"अरे मग दुसऱ्याकडे जायचे नाहीस का?"
आता आईला कसे सांगायचे की ह्या गोळ्या फारच महाग आहेत अन त्या घेण्यासाठी माझ्याकडे आता पैसे उरले नाहीत असे मनातल्या मनात विचार करीत अविनाश म्हणाले,"अग कोणाकडेच हि गोळी नव्हती."
"आता मला चहा मिळणार आहे का पियायला की पाण्यावरच भागवणार?" अविनाशने मंदाकडे तोंड वळवीत प्रश्न केला.
"हो मिळेल की, काय झाले न मिळायला! पण कोरा मिळेल दुध संपले आहे, सुजितला सांगितले होते दुध आणायला पण तो न ऐकताच खेळायला गेला. " एखादी गोष्ट सांगावी तशी सविस्तर माहिती मंदाने अविनाशला दिली.
"चालेल मला, पण लवकर आण म्हणजे झालं." अविनाश टेबलावरील वर्तमान पत्रांची चळत हातात घेवून चाळवयाला लागले.
"मंदा, आजचा पेपर कुठे आहे?"
"आज पेपरवाल्याने पेपर टाकला नाही, बहुतेक तीन महिन्याची थक-बाकी वसूल केल्याशिवाय तो पेपर टाकणार नाही वाटते.", मंदाने स्वयंपाक घरातून उत्तर दिले.
अविनाश निराशेने पेपर टेबलावर ठेवीत उठले व समोरच्या खिडकी समोर जावून उभे राहिले. खिडकीतून समोरचे मैदान स्पष्ट दिसत होते. काही मुले मैदानात फुटबाल खेळत होती. अविनाश एकटक त्या मुलांकडे पाहत कसला तरी विचार करत होते.
No comments:
Post a Comment