Saturday, June 25, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ९. क्षिना आणि एलेक्सची भेट

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ९. क्षिना आणि एलेक्सची भेट 

एलेक्स गाडी वेगाने चालवत होता त्याला लवकरात लवकर टेकडी मागे पोहचायचे होते. स्टेफनी अन एलेक्सच्या मते टेकडी मागे जंगल असावे, तिथे वणवा पेटला असावा. एलेक्स बहुदा जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी गाडी वेगाने हाकत होता. पाण्याने भरलेले कॅन्स ही त्यासाठीच गाडीत ठेवले होते.

गाडी आता टेकडीपाशी आली होती पुढे वळण होते. तो रस्ता टेकडीच्या मागे नेत होता. गाडी वळणावर वळते न वळते तोच समोरून एक सुंदर मुलगी चालत आडवी आली. एलेक्सने जोरात ब्रेक दाबला. ब्रेक दाबल्या दाबल्या गाडी दचके खात जागेवर उभी राहिली. जॉन बसलेल्या धक्याने रागावून एलेक्सकडे पाहत म्हणाला.
"हि काय पद्धत झाली गाडी चालवण्याची. तुला गाडी चालवता येत नसेल तर मी चालवतो आण".
एलेक्सने त्या तरुणीकडे उजव्या हाताचे बोट दाखवत जॉनला तिच्या उपस्थितीची जाणीव करून दिली.

"अहो मॅडम, तुम्हाला मरायचेच असेल तर दुसऱ्या कोणाची तरी गाडी शोधा, पण आमची वाट सोडा" 

जॉन तिला रागात भलते सलते बोलू लागला. तशी तिने गाडीला वाट करून दिली, पण चालता चालता तिने एक जळजळीत कटाक्ष जॉनकडे टाकला. जॉन हि तिच्याकडेच बघत होता, तिच्या नजरेशी नजर भिडताच त्याच्या शरीरातून एक भयाची लहर येऊन गेली. त्याने आपली नजर हटवून एलेक्सकडे पहिले. एव्हाना एलेक्सने तिथून गाडी हालवली होती.

"एलेक्स, ती मुलगी जरा विचित्र वाटत होती. नाही?" जॉन.
"नाही बुवा, मला तसे काही वाटले नाही." एलेक्स म्हणाला.
"अरे तिच्या हातात न काही तरी अजब प्रकारचे वॉच होते. दुसऱ्या हातात तर मला सुरा असल्यासारखे वाटले." जॉन .
"मला वाटते, तुझी रात्रीची अजून उतरली नाही, हो कशी उतरेल सहा - सात बॉटल घेतल्यावर?" एलेक्स टोमणा मारत म्हणाला.
"हं, काय म्हणालास सहा - सात बॉटल! तुला कोणी सांगितले?" जॉन 
"कोणी कशाला सांगायला हवे मी स्वतः पाहिलंय, त्या तिथे मक्याच्या शेतात" एलेक्स जॉनची मस्करी करत म्हणाला.

"कोणाला सांगू नको प्लीज, तिथे काय घडले ते." जॉन ओशाळत म्हणाला.
"ठीक आहे नाही सांगणार." असे म्हणत एलेक्सने पुढे नजर टाकली. समोरचे दृश्य पाहून त्याच्या तोंडातून नकळत शब्द निघाले. 
"ओह माय गॉड." 

ती दोघे आता टेकडीमागे पोहचली होती. समोरच जमिनीवर मोठा खड्डा पडलेला होता, जणू एखादे आटलेले छोटे तळे असावे. त्याच्या आजूबाजूला आगीच्या ठिणग्या पसरलेल्या होत्या. सभोवतालची झाडे मोडून पडली होती अन त्यांना आग हि लागली होती. एलेक्स पटकन उतरला, गाडीच्या मागच्या बाजूस ठेवलेल्या कॅन्स मधून एक उचलून तो त्या झाडांकडे धावू लागला. कॅन्समधील पाण्याच्या मदतीने तो लागलेली आग विझवू लागला. त्याला तसे करताना बघून जॉनही त्याची मदत करण्यास धावला. 

सगळी आग विझवून झाली, एलेक्स त्या खड्ड्याजवळ उभा राहून त्याचे निरीक्षण करीत होता.
"कशामुळे लागली असावी हि आग" जॉन मागून चालत येत एलेक्सच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
"माझ्या मते इथे एखादी वीज पडली असावी, ह्या दिवसात वीज पडणे हे कॉमन आहे. नाही का?" एलेक्स 
"हो तसेच असेल बहुतेक. चल आता निघायला हवं". जॉन 

एलेक्स, जॉन दोघे गाडीत बसले. जॉनने गाडी वळवली अन घराच्या दिशेने हाकली. या वेळेस जॉन गाडी चालवत होता.

जॉनने गाडी मुद्दामच घरासमोर दारात उभी केली. गाडीचा आवाज ऐकून स्टेफनी अन बेला धावत बाहेर आल्या.
जॉन - एलेक्स गाडीतून उतरून त्यांच्या दिशेने चालत होते. स्टेफनीने एलेक्सला करकचून मिठी मारली. तर जॉनने स्वतःच जवळ उभ्या असलेल्या बेलाला आणखी जवळ ओढत आपल्या मगरमिठीत सामावून घेतले.

बेला जॉनच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका करून घेण्याची धडपड करीत असताना जॉनचे लक्ष्य दाराकडे गेले. तो जोरात ओरडला
"अरे हि तीच मुलगी."

एलेक्सने वळून पहिले. दारात मघाशी रस्त्यात भेटलेली मुलगी दाराला टेकून उभी होती. ती क्षिनाच होती...

क्रमशः


No comments: