Sunday, July 3, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ११. डेस्टिनेशन प्लॅनेट अर्थ

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ११. डेस्टिनेशन प्लॅनेट अर्थ 

क्षिनाचे स्पेसशटल ब्लॅकहोलकडे खेचले जावू लागले तसं क्षिनाने स्पेसशटलमधील एक ब्लॅक कलरचे बटन दाबले. आता ते स्पेसशटल दुप्पट वेगाने ब्लॅकहोलमध्ये जावू लागले. काही क्षणातच ते स्पेसशटल दिसेनासे झाले. क्षिनाने फार कठीण पण जलद असा मार्ग निवडला होता,तिने ब्लॅकहोलमधून प्रवास करणे स्वीकारले होते. 


एलेक्स आराम खुर्चीवर बसला होता. स्टेफनी अन क्षिना सोफ्यावर बसून होत्या तर जॉन सोफ्यासमोर बेलाच्या मांडीवर डोके ठेवून जमिनीवर पडला होता, त्याने आपले पाय सोफ्याच्या उजव्या बाजूला ठेवले होते. बेला अधून मधून जॉनच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवीत होती. सगळे लक्ष्य देऊन क्षिनाची गोष्ट ऐकत होते.

क्षिनाने पुढे सांगण्यास सुरुवात केली.

"मी अन डॉक्टर स्पेंस दोघे हि धावत प्रयोग शाळेबाहेर निघालो. समोरून दोन गार्डस आमच्याच दिशेने चालत येत होते. त्यांनी आम्हाला धावताना पाहून, आम्हाला थांबवून धावण्याचे कारण विचारले." क्षिना सांगत होती.


"क्षिना, ते बघ समोर दोन गार्डस आपल्याच दिशेने येत आहेत." डॉ स्पेंस काळजीच्या सुरात म्हणाले.
"घाबरू नका डॉक्टर, मी बघते काय ते." क्षिना.

"डॉक्टर स्पेंस अन त्यांची असिस्टंट दोघ धावत येत आहेत, मला वाटते काही तरी गडबड असावी." पहिला गार्ड दुसऱ्याला म्हणाला.
"हो मलाही तसेच वाटतंय. चल त्यांनाच विचारूया" दुसरा गार्ड म्हणाला.

" डॉक्टर तुम्ही असे पळत का आहात?" पहिला गार्ड.
" अरे त्या..." डॉ स्पेंस अडखळत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते.
"त्या प्रयोगशाळेत आग लागली आहे अन प्रयोगाचे सामान फुटून तेथे विषारी वायू पसरला आहे. आम्ही कसेबसे आपला जीव वाचवत तिथून बाहेर पडलो आहोत, काही क्षण अजून तेथे असतो तर तुम्हाला आमची बॉडी देखील सापडली नसती. ते विषच असे होते कि त्याने तिथले पदार्थ झीजवण्यास सुरुवात केलीय.

"ठीक आहे तुम्ही जा आम्ही बघतो तिकडे." असे म्हणत दुसरा गार्ड पहिल्या गार्ड सोबत प्रयोगशाळेकडे धावू लागला.

"तू अस्स का सांगितलेस? आता त्यांना तिथे आग हि भेटणार नाही अन विषारी वायू हि नाही भेटणार. काही क्षणातच हे सगळे कमांडर ग्रेगरला कळेल, पुढच्याच क्षणाला आपण त्याचे कैदी असू."डॉ स्पेंस नाराजी व्यक्त करीत क्षिनाला म्हणाले.

"डॉ अस्स काही होणार नाही कारण आपण निघताना मी तिथे मॅग्मेर्सिकचे द्रव मिश्रण असलेली काचेची डब्बी फोडून टाकली आहे." क्षिना
"अरे पण आता ते दोन्ही गार्डस जिवंत येणे शक्य नाहीत." डॉ स्पेंस दोन्ही गार्डस विषयी चिंता करीत होते.

"एक मिनिट. हे मॅग्मेर्सिक काय आहे? अन ते दोन्ही गार्डस जिवंत परत का येवू शकणार नाहीत?" जॉनने क्षिनाला मधेच थांबवत आपली उत्सुकता दर्शवली.

"मॅग्मेर्सिक हा पाण्यासारखा दिसणारा पदार्थ आहे. तो आम्ही प्रयोगशाळेत निरनिराळ्या प्रयोगात वापरत असू. दिसायला जरी पाणी असले तरी त्याच्यासारखा जीवघेणा पदार्थ मी आजवर पाहीला नाही. याला आम्ही काचेच्या बंद डब्बीत ठेवत असू. याचा हवेतील ऑक्सिजनशी संबंध येताच त्याचे रुपांतर एखाद्या अ‍ॅसिडप्रमाणे  होते. जिथे या पदार्थाचे थेंब पडतात तो भाग झिजू लागतो अन पुढच्याच क्षणी याचे रुप एका ज्वाला मुखीतून निघालेल्या लाव्याप्रमाणे असते. हा पदार्थ एक विषारी वायू उत्सर्जित करतो, ज्याने श्वसन इंद्रियावर प्रक्रिया  घडून श्वसन क्रिया बंद पडते अन त्याच क्षणी त्या प्राण्याचा मृत्यू होतो." क्षिना सविस्तर सांगत होती.

"जर मॅग्मेर्सिकचा एक थेंब या इथे जमिनीवर पडला तर इथे ६-७ फुट खोल थेंबाच्या आकाराने खड्डा पडेल." क्षिना पुढे सांगू लागली.

"आम्ही स्पेससेंटर नजीकच्या रस्त्यावर आलो होतो. डॉक्टर स्पेंसना मी पुढे जाण्यास सांगितले. स्पेससेंटरच्या ८ नंबरच्या लॉन्चर वर काही स्पेसशटल्स उभी असल्याचेहि त्यांना सांगितले." क्षिना 


"डॉक्टर स्पेंस तुम्ही पुढे निघा, स्पेससेंटरच्या ८ नंबरच्या लॉन्चर वर काही स्पेसशटल्स उभी आहेत. त्यातील अल्फा-११ नावाच्या  स्पेसशटलवर तुम्हाला जायचे आहे. त्या स्पेसशटलने तुम्ही पृथ्वीपर्यंतचा प्रवास नक्कीच करू शकता."  क्षिना
"अन तुझे काय? तू माझ्या सोबत येत नाही आहेस?" डॉक्टर स्पेंस
"नाही सध्या तरी नाही पण नंतर मी जरूर तुम्हाला भेटेन, आता मला माझ्या आई अन भावाला सुरक्षित ठिकाणी पोहचवायचे आहे. तुम्ही निघा आता." 
"ठीक आहे क्षिना, हे घे DOTS (डीएनए ओफेनडर ट्रॅकिन्ग सिस्टम). अन हे आहे माझ्या डीएनएचे सॅम्पल. याने तू मला शोधू शकशील." असे म्हणत डॉ स्पेंस ने क्षिनाला आपल्या कवचाच्या कप्प्यातून  DOTS नावाचे उपकरण अन त्यांचे डीएनएचे सॅम्पल काढून दिले. आता ते वळून स्पेस सेंटर कडे जाऊ लागले. क्षिना अजूनहि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभी होती.

डॉ स्पेंस आता वळणावरून दिसेनासे झाले तशी क्षिना आपल्या घराकडे जायला निघाली. घराच्या दिशेने जात असताना क्षिनाला आकाशात एक स्पेसशटल लॉन्च झालेले दिसले. ते अल्फा -११ होते, डॉ स्पेंस पृथ्वीकडे निघाले होते.


क्रमशः 

No comments: