Thursday, July 21, 2011

शोध पानांचा - भाग १

disclaimer - ही कथा व कथेतील सर्व पात्रे, अन वाडा, संपूर्णतः काल्पनिक आहेत. मनोरंजन हा शुद्ध हेतू मनाशी बाळगून मी ही कथा लिहित आहे. कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तींशी काहीही सबंध नाही. आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथेत घडणारे प्रसंग माझ्या ऐकण्यात नाहीत किंवा मी त्यांचा पुरस्कारही करीत नाही. ही एक काल्पनिक कथा आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

भाग १ 

सकाळचे दहा वाजले होते.  बंडोपंत बागेत बागकाम करण्यात दंग झाले होते. शेजारीच त्यांचा सहा वर्षांचा नातू हर्ष त्यांच्या जॉनी या पाळीव कुत्र्यासोबत चेंडू घेऊन खेळत होता. बागेतील मोकळ्या जागेत चार-पाच गार्डन चेअर्स आणि एक टेबल ठेवला होता, त्यातील एका चेअर वर सरस्वती देवी वर्तमान पेपर वाचत बसल्या होत्या. समोरच्या टेबलावर कॉफीचा रिकामा कप ठेवलेला होता. बहुदा त्यांनी आताच कॉफी घेतली असावी.

बंडोपंत २ महिन्यापूर्वीच रिटायर झाले होते. ते कोल्हापुरात कलेक्टरच्या हुद्दयावर कार्यरत होते. शाहूपुरीत त्यांचा फार मोठा वाडा आहे. ८ वर्षांपूर्वीच त्यांनी हा वाडा श्री दामोदर पंत देशमुख यांच्याकडून विकत घेतला  होता आणि आता ते याच वाड्यात राहत होते, त्यांच्या पूर्ण कुटुंबासह.

वाडा तसा फार पुरातन काळाचा होता, जवळपास १०० -१५० वर्षांपूर्वीचा, इंग्रजांच्या काळातला. तात्यासाहेब देशमुख यांनी इंग्रजी आर्किटेक्चरवर भाळून बनवून घेतलेला. वाड्यावर इंग्रजी कलेची छटा दिसून येत होती. पण याच वाड्याने मराठी संस्कृतीही जपली होती. असा हा ऐतिहासिक वारसा जपलेला वाडा अजूनही तटस्थ उभा होता अन् यात आता राहत होते ते सरदेसाई कुटुंब. 

बंडोपंत हातात खुरपे घेऊन बागेतील नको असलेलं गवत काढीत होते. जवळच हर्ष आणि जॉनी आपल्याच मस्तीत खेळत होते. हर्ष चेंडू दूर फेकी अन जॉनी तो धावत जाऊन तोंडात पकडी असा त्यांचा खेळ चालू होता. ह्यावेळेस हर्षने हातातील चेंडू जोरात बागेच्या दिशेने भिरकावला. हर्षने फेकलेला चेंडू धरण्यासाठी जॉनी जवळच्या झाडीत शिरला. ५ -६ मिनिटे झाली तरी जॉनी काही परत येई ना म्हणून हर्ष त्या झाडीत शिरला. समोरचे दृश्य पाहून त्याने आजी सरस्वती देवींना हाक मारली. 

सरस्वती देवी धावत त्या झाडीत शिरल्या अन समोरचे दृश्य पाहताच त्या ही जागेवरच थबकल्या. जॉनी जुन्या वडाच्या झाडाखालील माती उकरत होता. त्याने जवळच मातीचा बराचसा ढीग लावला होता. आता जॉनी जोर जोरात भुंकू ही लागला होता. भुंकता भुंकता त्याने खोदणे चालूच ठेवले होते.

जॉनीचे भुंकणे ऐकून जवळच काम करणारा नोकर रामु अन बंडोपंत धावतच तेथे आले. आता पर्यंत जॉनी ने दीड फुट मोठा खड्डा केला होता. आता तो काही तरी वस्तु खेचून काढण्याचा प्रयत्न करत होता अन शेवटी त्याने ते खेचून काढलेच. जॉनीच्या तोंडात एक हाड होते. ते नुसते हाड नव्हे तर तो एक मानवी हाताचा सांगाडाच होता.  

क्रमशः


No comments: