Friday, July 22, 2011

शोध पानांचा - भाग २

भाग २ 

जॉनीने खेचून काढलेलं हाड पाहून सगळेच चांगले हबकले होते. सरस्वती देवींना तर दरदरून घाम फुटू लागला होता. त्यांनी हर्षला तिथून नेण्याचा प्रयत्न केला पण हर्ष काही जागचा हलेना, शेवटी त्याही चुपचाप त्याच्या सोबत तेथेच उभ्या राहिल्या.

जॉनी आता त्या हाडाला घेवून दूर गेला होता. बंडोपंत पुढे होवून जॉनीने उकरलेल्या खड्ड्यात पाहू लागले. त्यांना काही तरी जाणवले, त्यांनी रामूला नजरेनेच खुणावले. रामूला इशारा कळला अन तो बागेत काम करताना लागणारी पहार व कुदळ घेऊन आला. त्याने पहार बंडोपंतांच्या हाती दिली व स्वतः कुदळ घेवून त्या जागी खणू लागला. बंडोपंतांनीही पहार घेवून खोदणे चालू केले.

काही वेळातच त्या दोघांनी मिळून बराच मोठा खड्डा तयार केला होता. तरीही त्यांचे खणणे चालू होतेच. बंडोपंतांनी पहार जोरात जमिनीत हाणली तसा टांन असा आवाज झाला. त्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले. पंतानी पहार हळूच खेचून काढली. ते पहारीच्या टोकाने माती सरकवू लागले. लोखंडाचा स्पर्श जाणवताच त्यांनी रामूला हाताने खूण केली. रामू कुदळ बाजूला ठेवून हाताने माती काढू लागला. काही क्षणातच त्यांना मातीत दबलेली ती वस्तू स्पष्ट दिसू लागली, ती एक जुनी लोखंडी गंज चढलेली पेटी होती.

रामू अन पंतानी मिळून पेटी जमिनीतून वर काढली. पेटी जरी जुनी असली तरी फार मजबूत होती. धूळ झाडल्यावर त्या पेटीवरील नक्षीकाम उठून दिसत होते, पाहताच क्षणी पेटी पुरातन काळातील असावी असे वाटत होते. तिच्या कडीवर लोखंडी भले मोठे कुलूप लावलेले होते. कुलूप फारच जुने होते अन त्यालाही पेटीप्रमाणेच गंज चढला होता. 

जवळच उभा असलेला हर्ष सर्व काही बारीक नजरेने पाहत होता. पेटी पाहताच त्याला आनंद झाला होता. 

" खजिना सापडला, दादुला खजिना सापडला, दादू आपल्याला खजिना सापडला." हर्ष आनंदात नाचत तोतडे बोल बोलत होता.

"दादासाहेब, पेटीचे कुलूप जुने अन गंजलेले आहे, पहारीच्या एका घावात कुलूप तुटून जाईल. मी घालतो यावर एक घाव. " रामू पंताना म्हणाला. पंतानी ही त्याच्या म्हणण्याला मान हलवून दुजोरा दिला.

रामूने पहारीचा घाव त्या कुळूपावर घातला, पण कुलुपाचे काही वाकडे होऊ शकले नाही. खूप प्रयत्न करूनही कुलूप तुटू शकले नसल्याचे पाहून बंडोपंतानी रामूला पेटीची कडीच तोडायला सांगितले. रामूने पहारीचे एक टोक कडीच्या फटीत घातले अन दुसऱ्या टोकाला जोरात हिसका दिला, तशी कडी निखळून पेटीपासून विलग झाली. 

पेटीपासून विसखळीत झालेली कडी बाजूला सारून पंतानी पेटीचे झाकण उघडले. आत वाळवी लागलेला एक लाकडी खोका होता. तो खोका म्हणजे एक राजेशाही अलंकार ठेवण्याची पेटी होती. त्या पेटीवर सुंदर अशी अलंकारांचे नक्षीकाम केलेले होते. लाकडी पेटीवरील वाळवी, आपल्या खांद्यावरील फडक्याने पुसत पंतानी ती बाहेर काढली. सरस्वती देवी हे सगळे अचंब्याने बघत होत्या तर हर्ष आनंदाने उड्या मारत होता. सरस्वती देवी प्रश्नार्थक नजरेने कधी पंतांकडे तर कधी त्या पेटी कडे पाहत होत्या.
       
पंतानी ती पेटी अलगद उघडली. आता त्यांना कुलुपाप्रमाणेच गंजलेली जुनी चावी मिळाली. चावीवर काहीतरी लिहिलेले होते, परंतु दिसायला अस्पष्ट होते. चावीही फार गंजलेली होती. पंतानी चावी उचलली.

"दादासाहेब, आवं ह्याच कुलुपाची चावी असंल ती." रामू एखादे रहस्य उलगडावे तसे म्हणाला.
"हम्म ! मलाही तेच वाटतंय रामू." बंडोपंतांनी रामूच्या बोलण्याला दुजोरा दिला खरा पण त्यांना वाटत होते कि जर ही त्या कुलुपाची चावी असेल तर ती आत पेटीत गेली कशी? चावी आत असल्यावर बाहेरून कुलूप लावले कसे?

पंतांना काहीही वाटत असले तरी त्यांनी प्रयत्न म्हणून ती चावी त्या कुलुपात घातली अन कुलूप खोलण्याचा प्रयत्न केला. पण तो फोल ठरला. ती चावी त्या कुलुपाची नव्हतीच मुळी. तिचा कुलूप दुसरीकडेच कुठे तरी होता आणि तो कुठे होता हेच रहस्य होते. ते फक्त उलगडायचे बाकी होते.

लाकडी पेटीत अजून काहीतरी आहे का बघावे म्हणून पंतांनी पुन्हा त्या पेटीत हात घातला व ते चाचपू लागले.
अन अचानक खाड् असा आवाज झाला. अचानक झालेल्या आवाजाने हर्ष नाचायचं थांबला अन डोळे विस्फारून तो कधी आजी सरस्वती देवींकडे तर कधी लाकडी पेटी कडे पाहू लागला. पंतांच्या हातून पेटीचा चोर दरवाजा उघडला गेला होता. आत एक मखमली पांढरा कपडा, रुमालाची हातघडी करून ठेवावा तसा ठेवला होता.

पंतांनी तो कपडा बाहेर काढला आणि त्याची घडी उघडली. कपडा जवळपास दोन मीटर लांबी अन रुंदीला असावा. त्यावर काही तरी आढेवेढे चित्र रेखाटलेले होते. बंडोपंतांनी नीट निरखून पहिले. त्याच्या लक्ष्यात एक गोष्ट आली ती म्हणजे ते चित्र एक नकाशा होता,पण हा त्याच वाड्याचा नकाशा आहे हे त्यांना उमगले नाही.  

क्रमशः

2 comments:

Bhagyashree said...

Khup interesting hot ahe story...lakwarch pudcha bhag taka..

Captain Crunk [AKA Swapnil R. Pawar] said...

धन्यवाद भाग्यश्री. पुढील भागावर लिहितच आहे, पूर्ण होताच आपल्या वाचण्यासाठी प्रदर्शित होईल.