Saturday, July 12, 2014

शोध पानांचा - भाग ७

भाग ७

"तुम्ही नक्की पाहिलं आहे का ?" इन्स्पेक्टर बाजीराव शिंदे पंताना विचारणा करत होता.

दोन हवालदार वरच्या मजल्यावर झडती घेत होते. अर्थात झडती यासाठीच की काही पुरावा मिळावा ज्यावरून त्या दोन आकृत्यांचा अन निखिल वर झालेल्या हल्ल्याचा पाठपुरावा करता यावा.

निखिल ओसरीच्या पायरीवर बसून होता, डॉक्टर जोशी त्याच्या डोक्याभोवती पांढर्‍या रंगाची पट्टी गुंडाळत होते. जवळच सरस्वती देवी, गायत्री अन जेष्ठा उभ्या होत्या. निखिलवर झालेल्या हल्ल्याने सगळेच भांबवून गेले होते.  

"हो नक्कीच" पंत म्हणाले, "त्या दोन व्यक्ति होत्या. त्यांनीच निखिल वर हल्ला केला असावा. जेव्हा मी निखिलजवळ पोहोचलो, तेव्हा ते वाड्याच्या दरवाजातून पळून जात होते."

"त्यांपैकी एक वरच्या मजल्यावर काहीतरी शोधाशोध करत होता." ह्यावेळेस निखिल उतरला होता.
"त्याच्या हातात टॉर्च (विजेरी) होती. त्याला पकडण्यासाठी जेव्हा मी वरच्या मजल्यावर पोहचलो तेव्हा कोणीतरी मागुन माझ्यावर हल्ला केला. अर्थातच ते दोघ होते किंवा दोघांहुन जास्त असावीत. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला आणि समोरचे दिसेनासे झाले. पुढे काय घडले ते मला आठवत नाही. बहुदा माझी शुद्ध हरपली होती."

"मला तर वाटते ते भुरटे चोर असावेत" हेड-कॉन्स्टेबल जगदाळे हातातील रजिस्टरवर पेनाने खरडत म्हणाले.

"तुमचे स्टेटमेंट आम्ही लिहून घेतले आहेच. पाहू या आता झडतीत अजून काही मिळतंय का ते... "... शिंदे पुढे अजून काही बोलणार तोच हवालदार मानसिंगचा आवाज त्याच्या कानी ऐकू आला.

"साहेब, हे वरच्या मजल्याच्या कुंडीत अडकलेले होतं".

मानसिंग हातात पांढर्‍या रंगाचा मळकट पागोटा घेऊन उभा होता. असा पागोटा शेतकरी, धनगर, गावाकडची जवळपास सर्वच मंडळी डोक्याभोवती गुंडाळत असत. त्यामुळे तो नक्की कोणाचा आहे हे ओळखणे जरा कठीणच होते.

शिंदेने तो पागोटा हाती घेतला अन आपला मोर्चा पुन्हा पंतांकडे वळवला.

"तुम्ही ह्या कपड्याला ओळखता का?"
"नाही. मी किंवा माझ्या घरातले कोणीही ह्या कपड्यास ओळखत नाही. आमच्या कोणाचाच नाही आहे तो."

"तुमच्याकडे नोकर चाकर तर आहेत ना ? त्यांच्यातील एकाचाच असेल. बघा जरा नीट." बाजीरावने पंताना निरखून पाहण्यास संगितले.

"हो आहेत. रामु न वैजन्ता आहेत आमच्याकडे कामाला. रामु घरगडी आहे तर वैजन्ता स्वयंपाक गृहात काम करण्यास मदत करते. पण ते दोघेही असला कपडा वापरत नाही." पंत.  

"ठीक आहे तर मग. आता पुरती ही चौकशी इथेच थांबवतो. नाहीतरी रात्र फार झाली आहे. बघा घडयाळयात साडे बारा वाजत आहे. माझी बायको नक्कीच दारात वाट पाहत बसली असणार."

"चला डॉक्टर तुम्हाला ही सोडतो. तुमचं घर ही रस्त्यातच लागतं की आम्हाला."  बाजीराव डॉक्टर जोशींना उद्देशून म्हणाला.

"हम्मं, मी माझी मोटर सायकल आणली आहे सोबत. त्यानेच इथवर आलो होतो. दादासाहेबांचा फोन आला तसा लगबगीने निघालो होतो बघा." डॉक्टर जोशी.

"ठीक आहे जशी तुमची इच्छा. जगदाळे सर्व काही लिहून घेतलत ना व्यवस्थित?"

हेड-कॉन्स्टेबल जगदाळेनी मान डोलावली तसं शिंदे दुसर्‍या हवालदारास म्हणला  "चला मघ निघूयात. जयसिंग राव गाडी काढा."

शिंदे वाड्याबाहेर आला. जवळच असलेल्या दाट झाडीत हलकीच हालचाल झाली. शिंदेच्या पोलिसी वृत्तीला ती हालचाल जाणवली. तो दबक्या पावलांनी झाडी जवळ जाऊ लागला. काही अंतरावर पोहचताच झाडीतून भला मोठा उंदीर शिंदे कडे झेपावला. शिंदे सावध असल्याने लगेच बाजूस झाला. उंदीर दुसर्‍या बाजूस पळून गेला.

"साहेब, चला उशीर होतोय. " जगदाळे चा आवाज ऐकून काही क्षण स्तब्ध झालेला शिंदे भानावर आला अन जवळच उभ्या असलेल्या पोलिस वॅन मध्ये ड्रायवर शेजारी जाऊन बसला.

"हं, चला आता" त्याने ड्रायवरला निघण्याचा आदेश दिला. गाडी वेगात त्या जागेवरून निघून गेली.

दोन डोळे त्या झाडीतून भरधाव जाणार्‍या गाडीकडे बघत होते. त्याच्या चेहर्‍यावर सुटकेचे भाव अन हलके स्मित हास्य उमटले होते. पण अजूनही त्याच्या मनात भितियुक्त विचार येत होते.

"जर त्या इनिस्पेक्टरनं झाडीत बघितलं असतं तर ???"


क्रमशः    

भाग ६                                                                                                      भाग ८ 
                      

4 comments:

Unknown said...

Next part kadhi yenar....

Unknown said...

Next part kadhi yenar??

UMEDH FULCHAND DHAWARE said...

next part .????

Anonymous said...

nxt part ????