Saturday, July 12, 2014

शोध पानांचा - भाग ७

भाग ७

"तुम्ही नक्की पाहिलं आहे का ?" इन्स्पेक्टर बाजीराव शिंदे पंताना विचारणा करत होता.

दोन हवालदार वरच्या मजल्यावर झडती घेत होते. अर्थात झडती यासाठीच की काही पुरावा मिळावा ज्यावरून त्या दोन आकृत्यांचा अन निखिल वर झालेल्या हल्ल्याचा पाठपुरावा करता यावा.

निखिल ओसरीच्या पायरीवर बसून होता, डॉक्टर जोशी त्याच्या डोक्याभोवती पांढर्‍या रंगाची पट्टी गुंडाळत होते. जवळच सरस्वती देवी, गायत्री अन जेष्ठा उभ्या होत्या. निखिलवर झालेल्या हल्ल्याने सगळेच भांबवून गेले होते.  

"हो नक्कीच" पंत म्हणाले, "त्या दोन व्यक्ति होत्या. त्यांनीच निखिल वर हल्ला केला असावा. जेव्हा मी निखिलजवळ पोहोचलो, तेव्हा ते वाड्याच्या दरवाजातून पळून जात होते."

"त्यांपैकी एक वरच्या मजल्यावर काहीतरी शोधाशोध करत होता." ह्यावेळेस निखिल उतरला होता.
"त्याच्या हातात टॉर्च (विजेरी) होती. त्याला पकडण्यासाठी जेव्हा मी वरच्या मजल्यावर पोहचलो तेव्हा कोणीतरी मागुन माझ्यावर हल्ला केला. अर्थातच ते दोघ होते किंवा दोघांहुन जास्त असावीत. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला आणि समोरचे दिसेनासे झाले. पुढे काय घडले ते मला आठवत नाही. बहुदा माझी शुद्ध हरपली होती."

"मला तर वाटते ते भुरटे चोर असावेत" हेड-कॉन्स्टेबल जगदाळे हातातील रजिस्टरवर पेनाने खरडत म्हणाले.

"तुमचे स्टेटमेंट आम्ही लिहून घेतले आहेच. पाहू या आता झडतीत अजून काही मिळतंय का ते... "... शिंदे पुढे अजून काही बोलणार तोच हवालदार मानसिंगचा आवाज त्याच्या कानी ऐकू आला.

"साहेब, हे वरच्या मजल्याच्या कुंडीत अडकलेले होतं".

मानसिंग हातात पांढर्‍या रंगाचा मळकट पागोटा घेऊन उभा होता. असा पागोटा शेतकरी, धनगर, गावाकडची जवळपास सर्वच मंडळी डोक्याभोवती गुंडाळत असत. त्यामुळे तो नक्की कोणाचा आहे हे ओळखणे जरा कठीणच होते.

शिंदेने तो पागोटा हाती घेतला अन आपला मोर्चा पुन्हा पंतांकडे वळवला.

"तुम्ही ह्या कपड्याला ओळखता का?"
"नाही. मी किंवा माझ्या घरातले कोणीही ह्या कपड्यास ओळखत नाही. आमच्या कोणाचाच नाही आहे तो."

"तुमच्याकडे नोकर चाकर तर आहेत ना ? त्यांच्यातील एकाचाच असेल. बघा जरा नीट." बाजीरावने पंताना निरखून पाहण्यास संगितले.

"हो आहेत. रामु न वैजन्ता आहेत आमच्याकडे कामाला. रामु घरगडी आहे तर वैजन्ता स्वयंपाक गृहात काम करण्यास मदत करते. पण ते दोघेही असला कपडा वापरत नाही." पंत.  

"ठीक आहे तर मग. आता पुरती ही चौकशी इथेच थांबवतो. नाहीतरी रात्र फार झाली आहे. बघा घडयाळयात साडे बारा वाजत आहे. माझी बायको नक्कीच दारात वाट पाहत बसली असणार."

"चला डॉक्टर तुम्हाला ही सोडतो. तुमचं घर ही रस्त्यातच लागतं की आम्हाला."  बाजीराव डॉक्टर जोशींना उद्देशून म्हणाला.

"हम्मं, मी माझी मोटर सायकल आणली आहे सोबत. त्यानेच इथवर आलो होतो. दादासाहेबांचा फोन आला तसा लगबगीने निघालो होतो बघा." डॉक्टर जोशी.

"ठीक आहे जशी तुमची इच्छा. जगदाळे सर्व काही लिहून घेतलत ना व्यवस्थित?"

हेड-कॉन्स्टेबल जगदाळेनी मान डोलावली तसं शिंदे दुसर्‍या हवालदारास म्हणला  "चला मघ निघूयात. जयसिंग राव गाडी काढा."

शिंदे वाड्याबाहेर आला. जवळच असलेल्या दाट झाडीत हलकीच हालचाल झाली. शिंदेच्या पोलिसी वृत्तीला ती हालचाल जाणवली. तो दबक्या पावलांनी झाडी जवळ जाऊ लागला. काही अंतरावर पोहचताच झाडीतून भला मोठा उंदीर शिंदे कडे झेपावला. शिंदे सावध असल्याने लगेच बाजूस झाला. उंदीर दुसर्‍या बाजूस पळून गेला.

"साहेब, चला उशीर होतोय. " जगदाळे चा आवाज ऐकून काही क्षण स्तब्ध झालेला शिंदे भानावर आला अन जवळच उभ्या असलेल्या पोलिस वॅन मध्ये ड्रायवर शेजारी जाऊन बसला.

"हं, चला आता" त्याने ड्रायवरला निघण्याचा आदेश दिला. गाडी वेगात त्या जागेवरून निघून गेली.

दोन डोळे त्या झाडीतून भरधाव जाणार्‍या गाडीकडे बघत होते. त्याच्या चेहर्‍यावर सुटकेचे भाव अन हलके स्मित हास्य उमटले होते. पण अजूनही त्याच्या मनात भितियुक्त विचार येत होते.

"जर त्या इनिस्पेक्टरनं झाडीत बघितलं असतं तर ???"


क्रमशः    

भाग ६                                                                                                      भाग ८ 
                      

Monday, June 30, 2014

शोध पानांचा - भाग ६

भाग ६

रात्रीचे दहा वाजले होते. वाड्यात सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. सगळे जण आपआपल्या खोलीत झोपायला गेले होते. जॉनी ओसरीतील पाळण्याजवळच पाय पसरून झोपला होता. इकडे निखिल त्याच्या रूम मध्ये लॅपटॉप उघडून प्रेझेंटेशन बनवण्यात गढून गेला होता.

आजच त्याची शाह बरोबर मीटिंग झाली होती. शाहला प्रोजेक्ट पसंद तर पडला होता पण त्याचा असिस्टेंट तोराणी उगाचच खुसपट काढत होता. वरकरणी शाह सुद्धा तोराणीच्या म्हणण्याला दुजोरा देत होता. शेवटी काही नवीन आयडियाज अॅड करून व काही अॅडिश्नल फीचेर्स काढून शाह पुन्हा एकदा प्रेझेंटेशन साठी तयार होता. पुढील मीटिंग येत्या शुक्रवारी हॉटेल डिप्लोमाट मध्ये होती. मीटिंगला शाह सोबत तोराणी असणारच होता पण ह्या वेळीस शाह अँड सन्स चे अधिकृत बिजनेस पार्टनर ए. के सुद्धा मीटिंगला हजर राहणार होते. ए.के. - शाह अँड सन्स मध्ये या व्यक्तिला ए.के. म्हणूनच ओळखले जाते त्यांचे पूर्ण नाव कोणीच घेत नसे त्यामुळे निखिलला त्यांचे पूर्ण नाव माहीत नव्हते - शाह अँड सन्स चे ५२ टक्के भागीदार होते आणि त्यांच्या होकराशिवाय हा प्रोजेक्ट होणे शक्यच नव्हते. प्रोजेक्ट ची इन्वेस्टमेंट जवळपास कोटींमध्ये होती अन त्याचा फायदाही तेवढाच होणार होता.

ए.के. चे नाव लौकिक निखिल ऐकून होता. ह्या व्यक्तीचा मोठा दबदबा होता ऑफिस मध्ये. खूप शिस्तप्रिय अन कमालीची वक्तशीर आहे ही व्यक्ति असे निखिलच्या कानी पडले होते, ए. के.ला कसलीही धिरंगाई आवडत नसे. म्हणूनच निखिल फावल्या वेळेत प्रेझेंटेशनचे काम करीत होता. त्याला कसली ही उणीव ठेवायची नव्हती ह्या मीटिंगला. कसेही करून प्रोजेक्ट मिळवायचा होता. तो मन लावून काम करत होता.

इतक्यात त्याचा मोबाइल फोनची रिंगटोन वाजू लागली. "एवरीडे आय वांट टु फ्लाय स्टे बाय माय साइड..." निखिल ने मोबाइल फोन उचलला. स्क्रीन वर राजश्री चे नाव फ्लॅश होत होते. त्याने स्क्रीनवर बोटाने टच करून बोट उजव्या बाजूस सरकवले अन फोन कानाला लावला.

"हा बोल राज"

"निखिल, सॉरी. आय क्नो आयम डिस्टर्बिंग यू बट धिस मॅटर इज अर्जंट." पलीकडून राजश्री बोलत होती.

"आता काय झाले? अबाऊट व्हॉट यू आर टौकींग?" 

"अरे निखिल, तोराणीचा मघाशी मला कॉल आला होता. तो ए.के. बद्दल बोलत होता. परवा ए.के. लंडनहून फ्लाइट ने येत आहे. तुला भेटायचे आहे ह्या व्यक्तीला. तिची म्हणे ती अट आहे, विदाउट पर्सनल मीटिंग विथ निखिल, द प्रोजेक्ट मीटिंग विल नॉट गोइंग टु हप्पेन. दॅट पर्सन बीलिव्स इन पर्सनल इंटरअॅक्शन.सो यू हॅव टू रीसीव ए.के. ऑन मंडे. फ्लाइट विल आराईव अॅट ३:१० पीएम. अँड हा, बी ऑन टाइम, दॅट पर्सन डज नॉट लाइक लेट कमर्स."

"ओके. आय विल बी राइट देअर ऑन राइट टाइम" 

" तू नेहमी असे बोलतोस अन उशिरा येतोस. पण ह्या वेळेस असे करू नकोस नाही तर आपला प्रोजेक्ट गेलाच म्हणून समझ." 

"हो ग बाई माझी. मी नक्की टाईमवर पोहचेन एयरपोर्ट ला तू काळजी करू नकोस. मी उद्या सकाळीच इथून निघतो आहे. बाकी ऑफिसला आल्यावर बोलतो." 

"ठीक आहे. ठेवू फोन ?"

"ओके. बाय गुड नाइट. टेक केयर."

"बाय." 


आता अजून एक गोष्ट त्याच्या पथ्यावर पडली होती. त्याच गोष्टीचा विचार करत निखिल जागेवरून पाणी पिण्यासाठी उठला. टेबलावर ठेवलेला जग उचलून पहिलं तर त्यातले पाणी संपले होते. वैतागून तो स्वयंपाक घराकडे पाणी घेण्यासाठी जायला निघाला. स्वयंपाक घरातील फ्रीज मधून त्याने पाणी पिले अन तो पुन्हा आपल्या रूम कडे जाऊ लागला. त्याला जॉनीची आठवण आली म्हणून तो ओसरीत येऊन जॉनीला पाहू लागला. 

अचानक त्याला वरच्या मजल्यावर प्रकाशाचा झोत दिसला. त्याप्रकाशा बरोबरच त्याला एक काळी कुट्ट आकृती पुढे सरकताना दिसली.      

निखिल सावधपणे वरच्या मजल्याकडे निघाला. तो पहिल्या मजल्यावर पोचतो न पोचतो तोच त्याच्या डोक्यात मागून कोणीतरी प्रहार केला. डोक्याला जबरदस्त मार लागल्याने निखिल मोठयाने ओरडला न जागीच बेशुद्ध झाला. त्याच्या ओरडण्याने घरातले सर्व जागे झाले.

दादासाहेब धावत त्यांच्या रूम मधून बाहेर आले. त्यांना जमिनीवर पडलेला निखिल दिसला, त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. ते धावत त्याच्या जवळ पोचले. अचानक त्यांची नजर वाड्याच्या दरवाजाकडे गेली दोन आकृत्या त्या दरवाज्यातून बाहेर पडत होत्या. 

क्रमशः

भाग ५                                                                                                      भाग ७