Tuesday, April 16, 2013

पुनर्जन्म असतो का???

१५ एप्रिल २०१३

ऑफिस मधून घरी आल्यावर मी आंघोळ करून पुजेसाठी बसलो होतो. तसे मी काही रोज पुजा पाठ करत नाही. पण काही दिवसांपासून देवाकडे काही मागतो आहे, माझे प्रेम, माझे जीवन जे माझ्यापासून दूर चालले आहे, ते मागतो आहे. त्यासाठी कित्येक वेळा त्या भगवंताच्या विनवण्या- आळवण्या करीत आहे. बाकी सर्व त्याच्या हातात आहे.

हा तर मी कुठे होतो ? हा पुजेसाठी बसलो होतो. पुजा करताना ध्यान मग्न होऊन देवाला आळवित होतो. माझ्या प्रेमाचा उद्धार करावा म्हणून त्यास विनवीत होतो. मी तिचाच विचार करत होतो. तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता अन डोळ्यातून अश्रूंची धार लागली... त्यातच कधी मी ध्यानस्थ झालो माझे मलाच माहीत नाही... पण जे काही मला अनुभवास आले किंवा दिसले ते सांगण्याकरिताच मी लिहीत आहे.

३० वर्षापूर्वी.... पालीनगर नावाचे एक छोटेसे गाव मध्यप्रदेशमध्ये होते. या गावात एक कुंभार राहत होता. कुंभार मेहनतीने मडके बनवायचा अन दुसर्‍या गावी जाऊन ते विकून आपले पोट भरायचा. या कुंभाराला एक सुंदरशी मुलगी होती, नाव होते हंसामती. ती त्याला मडके बनवण्यात मदत करत असे. कुंभाराची बायको आजाराने मुलगी लहान असतानाच वारली होती. बापाने तिचे संगोपन करून वाढवली, १५-१६ वर्षाची झाली होती ती, वयात आली होती. बापाला तिच्या लग्नाची चिंता लागली होती.

त्याच गावात ईश्वर नावाचा एक चरवाह (मेंढपाळ) राहत होता. १७ वर्षाचा तो मुलगा आपल्या आई सोबत राहत असे. रोज तो मेंढरे चारायला गावाबाहेर नेत असे. गावाबाहेर जाणारी वाट त्या कुंभाराच्या घरासमोरून जाई. सकाळच्या सुमारास हंसा मडकी घेऊन अंगणात वळवण्यासाठी रचून ठेवीत असे. असेच एकदा दोघांची नजारा नजर झाली. मेंढपाळाचे मुलीवर बघताच क्षणी प्रेम बसले. त्याने पाण्याच्या निमित्ताने तिच्याशी बोलण्याचे ठरवले.

त्याने दार ठोठावले अन विचारले "कोणी आहे का घरात ?"
आतून आवाज आला. "बाबा नाही आहेत घरात तुम्ही नंतर या"
"पानी हवे होते प्यायला"

तिने पेल्यात पाणी आणून दिले त्याला. त्याने तिच्याकडे बघतच पाणी पिले. आता रोज तो पाणी पिण्याच्या बहाण्याने तिला बघत असे. ती ही त्याच्याकडे आकर्षित झाली होती. रोजच्या भेटी गाठीने दोघांचे प्रेम वाढू लागले. दोघे दुपारी गावाच्या वेशीबाहेर वडाच्या झाडामागे भेटत असत. असेच प्रेमाचे दिवस चालले होते.

एक दिवशी कुंभार आनंदाने घरी आला. त्याने त्याच्या मुलीसाठी चांगले स्थळ शोधले होते. पाच कोसावर असलेल्या गावात तो आपली मुलगी देणार होता. मुलीला त्याने सर्व संगितले. मुलीचे मन हिरमुसले, पण बापाच्या आनंदासमोर तिने आपले प्रेम बळी दिले. दुपारी ती त्याला भेटली.

"आता आपले नाते संपले आहे. आपल्या हातातून निसटले आहे सगळे. मी काही करू शकत नाही. माझे लग्न ठरले आहे. तू मला विसरून जा, आपले जीवन आनंदाने जग."
"कसे जगू? तुझ्याविणा हे सर्व जग, धन दौलत, प्रेम, नाते संबंध सगळं सगळं व्यर्थ आहे. मी नाही जगू शकत तुझ्याविणा."
"तुला मला विसरावेच लागेल." ती रडत निघून गेली.
मुलगा तिला पाठमोरी जाताना बघत राहिला. त्याला काय करावे ते सुचेना...

लग्नाचा दिवस उजाडला होता. कुंभाराच्या घरी लग्नाची तयारी चालू होती... दोन दिवसापूर्वी ते जोडपं पुन्हा एकदा भेटले होते. शेवटचे एकमेकांना बघायला, दोघं एकमेकांशी बोललेच नाहीत, बोलत होते ते फक्त त्यांचे डोळे. प्रेमाने उर दाटून आला होता. दोघांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले होते. पण तरीही ते दोघ बोलले नाहीत, बोलूच शकत नव्हते.

लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. मुलीला लग्नमंडपात बोलावले. मुलगी अतिशय सुंदर दिसत होती. पण तिचे डोळे रडून रडून सुजले होते. इकडे लग्नाची सुरवात झाली. तिकडे मुलाने घरात गळफास लावून घेतला. त्याने आत्महत्या केली. त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, तो तिला दुसर्‍याच्या घरी जाताना पाहू शकणार नव्हता..

एक जीव गेला. आता दुसर्‍याची बारी होती. लग्नाचे चार फेरे पूर्ण झाले होते. पाचवा फेरा होणारच होता त्यातच मुलगी चक्कर येऊन खाली पडली. तिच्या तोडून सफेद फेस येऊ लागला होता. तोंड घामाने डबडबलेले होते. अर्ध्या तासापूर्वी तिने विष पिले होते. पाच मिनिटातच तिचे ही प्राण पाखेरू उडून गेले. दूसरा जीव ही आपले प्रेम निभावून गेला...

मी दचकून भानावर आलो. मी घामाने ओला चिंब झालो होतो. घाबरलेलो होतो. तिला मरताना मी पाहू शकलो नाही. माझे अश्रु पुन्हा ओघळू लागले. जे काही मी पाहिले किंवा अनुभवले, ते सत्य होते का? कारण ज्या गोष्टी त्यांच्या बरोबर घडल्या होत्या तश्याच माझ्या जीवनात ही घडल्या आहेत. तिचे लग्न ठरले आहे. १ महिन्याने तिचे लग्न आहे. कदाचित ती घटना माझ्या मागच्या जन्माची तर नाही ना ? पुन्हा माझ्यासोबत तेच घडत आहे असे तर नाही ना ? मला तर ते गावं सत्य परिस्थितीत आहे की नाही ते ही माहीत नाही. मला हे ही माहीत नाही जे पाहिले ते स्वप्न होते की माझा भास..  कुणीतरी सांगेल का? मला माझे प्रेम भेटेल का??? खरच पुनर्जन्म असतो का???                

(कृपया माझ्या प्रेमासाठी प्रार्थना करा. I need your blessings,badly.)
                     
                                          

1 comment:

दीपिका said...

खुप छान लिहिलंय