इन्कार्नेशन - द मिस्ट्री ऑफ लाईफ
भाग ३ अजून एक बळी
१ जानेवारी १९८७, धारावी पोलिस स्टेशन, दुपारी ४ वाजून २५ मिनिटे.
हेड-कॉन्स्टेबल पवार आपल्या
टेबलासमोरील खुर्चीत बसून चहा पित होते. चहा पिता-पिता त्यांचे लक्ष्य टेबलावर ठेवलेल्या
फाईलींच्या गठ्ठयावर जात होते. त्या गठ्ठयात आज नवीन केसची भर पडल्याने ते फारच अस्वस्थ
होते. ती केस होती त्या मुलीची – त्या अर्धवट जळालेल्या मुलीची. अनामिक नावे ती केस
खुली होती. मुलीची असमत लुटल्याचे स्पष्ट दिसून येत असूनही त्या फाईल मध्ये अजूनही
तसे काहीच लिहिले नव्हते. पोस्ट मार्टमचा रिपोर्ट अजून आला नसल्याने तसे काही नमूद
करणेही शक्य नव्हते. वेळीच पोहचलेल्या फोटोग्राफरने निरनिराळ्या कोनातून काढलेले फोटो
त्या फाईलमध्ये अनुक्रमे १, २, ३ अशी नावे
देऊन संग्रहीत केलेले होते.
“कायकु सोचता है, उसके बारेंमे.
छोड ना.” सब-इंस्पेक्टर मोईन खान पवारला विचारात गढलेले पाहून चेष्टेने म्हणाला.
“साहेब, त्या जागी अगर तुमची
मुलगी असती तर?” पवार यांनी चेष्टेचे उत्तर प्रश्नाने दिले.
“सारा. नही नही. ए पवार, तू साला जास्तच विचार करतोयस. आता बस झालं हं.” मोईन खान पाय आपटत बाहेर निघून गेला.
पवार यांना माहीत होतं, मोईन खान त्याच्या मुलीवर – सारावर जिवापाड प्रेम करत असे. म्हणूनच त्यांनी
मोईनच्या चेष्टेवर प्रश्नाचा असा अचूक बाण सोडला होता, जो वर्मी
लागला होता.
पवार चहाचा कप टेबलावर ठेवत असतानाच एक इसम पोलिस चौकीच्या
आवारात शिरताना त्यांनी पहिला. त्याने बोकडासारखी दाढी राखलेली होती. वय साधारणतः ३०-४०
असावे. डोक्यावरील केस तुरळकच होते, जे होते तेही अस्त-व्यस्त
होते. त्याने अंगात मळलेला पांढरा कमिज अन पायात तोकडा असा पायजमा घातलेला होता. तो
पायजमा इतका तोकडा होता की त्याच्या पायात घातलेल्या पॅरागाँन भुईसपाट होत आलेल्या
चपलांपासून तो दीड- वित उंचावर होता अन त्या काडी पैलवानाच्या काडीसमान पायांचे प्रदर्शन
घडवित होता.
तो काडी पैलवान आता सरळ-सरळ पवारच्या टेबलाजवळ येऊन
उभा राहीला. खरे तर उभा म्हणणे चुकीचे होईल की काय अशाच अवस्थेत तो होता. तो दारू मध्ये
झिंगलेला दिसत होता.
“काय रे सकाळची उतरली नाय वाटतं? का आत्ताच घेऊन आलायस?” बाजूलाच उभा असलेल्या कॉन्स्टेबल
शिंदेने त्याला फटकारत विचारले.
“साब मेरेको......” त्याने अडखळत बोलण्यास सुरुवात केली.
पवार यांना दारूची फवारणी तोंडासमोर फवारल्यागत जाणवली.
“पुढं बोल की लेकाच्या.” तोंडावर रुमाल ठेवत पवार म्हणाले.
“साब, साब मेरे को रपट लिखाना
है” त्याने रडत सांगायला सुरुवात केली. “साब मेरा नाम हसन शेख, मै उधर धारावी के झोपडी मे रहता है. मेरेको दो बेटी और एक बेटा है साब. बडी
का नाम अदा है वो कल रात को घर से गायब है साब.”
“रात को सोते वक्त तो हमारे साथ ही सोई थी. मै जब सुबह
को उठा तो देखा की घर का दरवाजा खुला है. मै गुस्सेमे बेटी को चिल्लाया पर वो घर मे
नही थी. मुझे लगा की गयी होगी दो नंबर को तो मै दरवाजा लगा के फिर सो गया”
तो श्वास घ्यायला थांबला. त्याच्या गालावरून अश्रु ओघळत
होते. पवार यांना केसबद्दल हलकी जाणीव झाली. परंतु त्याच्या पुढील बोलण्याची वाट पाहत
पवार म्हणाले, “और आगे?”
“निंद खुली तब सदाह और अल्ताफ दोनो रो-रोकर मुझे जगा
रहे थे. वो कहने लगे, अब्बू आपा घर मे नही है. हमने आस पास
बहुत ढुंढा पर वो कही नही मिल रही. इसके बाद मै भी उसे आसपास, पडोस मे ढुंढने लगा. पहचान वालोंसे उसके बारे मे पुछा पर कुछ पता नही चला
तो यहा रपट लिखाने चला आया साब.”
“इन तस्विरोंको देख. कही ये तो नही?” समोरील फाईलमधील फोटो त्याच्यासमोर करत पवार म्हणाले.
“ये तो ..........” हसन किंचाळत उठला “ नफिसा बानो...”
त्याच्या हातातून ते फोटो खाली गळून पडले . तो एखाद्या वेड्यासारखे आपले केस उपटू लागला.
जोरात ओरडत तो पोलिस चौकीतून बाहेर पडला. पवार ही त्याच्यामागे धावत गेले. शिंदे ही
मागोमाग होताच. हसन वेड्यासारखा इकडे तिकडे पळत सुटला होता. वेड्याच्या भरात तो मेन
रस्ता ओलांडू लागला अन जोरात धप्प असा आवाज आला.
2 comments:
Interesting!!
Post a Comment