Wednesday, April 25, 2012

द एलिअन टेक्नोलॉजी - ch १३. क्षिनावरील हल्ला

द एलिअन टेक्नोलॉजी  - ch १३. क्षिनावरील हल्ला

क्षिनाला आता पर्यन्त कळून चुकले होते की ती आता काळ नावाच्या डायमेंशन मध्ये येऊन पोहचली होती. इथे काळाचे मापदंड वेगळेच होते. प्रत्येक क्षणाला काळ आपले रूप बदलत होता. आता तिला त्या डायमेंशन मध्ये थांबणे धोक्याचे होते, काही क्षणातच तिच्यावर तिथल्या काळाचा परिणाम होणार होता. त्या आधीच तिला तिथून निघणे फार गरजेचे होते.

क्षिनाने स्पेस शटल मागे वळवले. पुन्हा तिने जेलटेक इंजिन चालू केले. आता ती आपल्या डायमेंशन कडे परतीचा प्रवास करू लागली. आलेल्या काळ्या गोलामधून तिचे स्पेस शटल जाऊ लागले. काही अंतर कापल्यावर क्षिना पुन्हा जल डायमेंशन मध्ये येवून पोहचली.

क्षिना आपला मार्ग चुकली होती. तिला डायमेंशनच्या प्रवासाबद्दल तशी फार माहिती होती, परंतु या आधी तिने स्वतः कधीच  ब्लॅकहोलचा प्रवास केला नव्हता. तिच्याकडे जी काही माहिती होती, ती सर्वच तिला डॉ. स्पेन्स कडूनच मिळाली होती. खर तर डॉ. स्पेन्स यांनी ब्लॅकहोलचा व त्याच्या प्रवासाचा सिद्धांत मांडला होता. त्यांनी यासाठीच  ब्लॅकहोलचे प्रायोगिक प्रवास केले होते आणि पहिले ३७ डायमेंशनस शोधून काढले.  त्यांच्या सिद्धांतानुसार ब्लॅकहोल हा एका दुंनियेतून दुसर्‍या दुनियेत जाण्याचा मार्ग आहे. परंतु त्यासाठी त्या ब्लॅकहोलची  पूर्व माहिती असणे गरजेचे आहे अन्यथा अघटित असा प्रसंग ओढवू शकतो.

अन नेमकी हीच चूक क्षिना करून बसली होती. तिच्याकडे या शिवाय दूसरा जलद असा मार्गच नव्हता.

क्षिना आपल्या जवळ असलेल्या गॅलेक्टीक स्पेस मॅपवर दिशा निर्देशाचे संकेत पाहू लागली. स्पेस मॅप शून्य दिशा निर्देश करत इथून तिकडे सुई फिरवत होता. जल डायमेन्शनमध्ये ते स्पेस शटल पुढे जाऊ लागले.

अचानक क्षिनाच्या स्पेस शटलला डावीकडून जोरात हिसका बसला. त्या धक्क्यामुळे शटल उजव्या बाजूस कलंडले. कसेबसे क्षिनाने ते स्पेस शटल सावरले होते. जमिनीतून वर आलेल्या खडकाला  शटल धडकल्याने तो जोरदार हिसका बसला असावा असे समजून क्षिनाने ते शटल पुन्हा समोर हाकले. परंतु क्षिना एक महत्त्वाची गोष्ट विसरून गेली होती, जल डायमेंशनमध्ये जमिनीचा लवलेश हि नव्हता, जलाखालीही.

शटल काही अंतर गेले असेल तोच स्पेस शटलला पुन्हा डावीकडून जोरात हिसका बसला. लगोलग उजवीकडून हि तसाच हिसका बसला. आता मात्र क्षिनाला धोक्याची जाणीव झाली. तिच्या स्पेस शटलवर हल्ला करण्यात आला होता.  

आता एकाच वेळी उजवी अन डावी बाजू दोन्हीकडून शटलवर हल्ले होवू लागले. शटलवर हल्ले करणारे ते भीमकाय असे प्राणी पृथ्वीवरील ब्लू व्हेल पेक्ष्या आकाराने तिप्पट होते. ते सारेच झुंडीत राहून शिकार करीत असावेत. यावेळीही सहा- सात च्या जोडीने ते प्राणी क्षिनाच्या शटलवर हल्ले चढवीत होते. 

अश्या भीमकाय प्राण्यांच्या हल्ल्यातून क्षिनाचे जिवंत वाचणे अशक्यच दिसत होते. 

क्रमशः   

Previous / Next 

1 comment:

Suhas Bhuse said...

Mast jabardast
when d next part will comes ?
im wating