Monday, August 8, 2011

शोध पानांचा - भाग ५

भाग ५

इंस्पेक्टर बाजीराव शिंदे पुन्हा वाड्यात शिरला होता. त्याच्या हातात कसले तरी पुडके होते. त्याला पाहताच बंडोपंत व निखिल दोघेही जागेवरून उठून उभे राहिले. 
"तुम्ही इथे? अन या वेळेला?" बंडोपंत म्हणाले.
"हो कारणच तसे आहे. यावे लागले." इंस्पेक्टर शिंदे म्हणाला. " पण हे कोण? इथे काय करत आहेत?"
"हा माझा धाकटा मुलगा, निखिल." बंडोपंत म्हणाले,"मुंबईत राहतो, त्याचा मोठा बिज..."
"डॅड, एक मिनिट, मला बोलू द्या." निखिलने पंतांना मध्येच अडवले. त्याने आपला मोर्चा इंस्पेक्टर शिंदे कडे वळवला.
"हम्मं, तुम्ही काहीतरी सांगत होता. हो, तुम्ही इथं येण्याचं कारण सांगणार होता. काय काम काढलं आमच्या कडे?" निखिल म्हणाला.


"तसं काही खास नाही, पण हे द्याचे होते म्हणून आलो."  शिंदे पुडके पुढे करत म्हणाला  


"काय आहे ते?" निखिल     
"तुम्हीच बघा काढून." शिंदेने ते पुडके निखिलच्या हातात दिले.


निखिलने ते पुडके फोडले अन त्यात हात घातला. त्यात दोन वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या बंद तोंडाच्या थैल्या होत्या. पहिल्या थैलीत वाड्याचा नकाशा होता तर दुसर्‍या थैलीत गंज चढलेली चावी होती.




"हे सर्व तुमच्या ताब्यात देतो आहे, सकाळी ठाण्यात येवून नोंद रजीस्टर मध्ये सही करून जा." शिंदे 
"ठीक आहे, पण हे सर्व तर पुरावा म्हणून तुमच्याकडे असले पाहिजेत. तुम्ही असेच देत आहात?" निखिल 
"वरुन, ऑर्डर आली आहे की ह्या केसला जास्त वेळ न देता पोरं पळविणार्‍या गॅंगला पकडण्याकडे लक्ष्य द्या." तसे ही त्या हाडाची फॉरेन्सिक टेस्ट झाली आहे अन त्याचा रीपोर्ट ही आला आहे." शिंदे


"काय आहे त्यात?" बंडोपंत    
"त्या मनुष्याचा मृत्यू २ वर्षांपूर्वी झाला असावा असा अंदाज आहे, अन माझ्या माहितीनुसार त्या वेळी तुम्ही इथे राहायला आला नव्हता." शिंदे.


बंडोपंतांनी एक दीर्घ सुस्कार सोडला.


"जरी मी हे पुरावे तुम्हाला देत असलो तरी लक्ष्यात राहू द्या की केस अजून बंद झाली नाही आहे. ती माझ्याकडेच आहे. अन तुम्ही दोन वर्षांपूर्वी जरी इथे राहत नव्हता तरीही वाडा तुमच्याच मालकीचा होता, हो की नाही ?" त्याने बंडोपंतांकडे तिरक्या  नजरेने पाहिले.


"ठीक आहे आम्ही लक्ष्यात ठेवू. तुम्ही या आता." निखिल म्हणाला.


शिंदे दरवाज्याकडे वळला अन दरवाज्याकडे चालू लागणार तोच त्याला काही तरी आठवले अन पुन्हा निखिल कडे वळून तो म्हणाला.
"हा नकाशा याच वाड्याचा असावा असं आमच्या एक्स्पर्टचं मत आहे. पहा काही सांगता येतं का?"

शिंदे आला तसा निघून गेला. बंडोपंत अजूनही वाड्याच्या मुख्य दरवाज्याकडे पहात उभे राहिले होते.


"निखिल, दादा साहेब जेवायला मांडले आहे. जेवायला चला." गायत्री वहिनी आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाल्या.


निखिल अन बंडोपंत आत जेवायला निघून गेले.निखिलच्या डोक्यात अजूनही नकाशा अन चावी विषयीचे विचार काहुर माजवत होते. 


नकाशा, तोही याच वाड्याचा? अन असा सापडावा? मग ती चावी कशाची असावी ?   


क्रमशः


भाग ४ भाग ६ 

Wednesday, August 3, 2011

बंधन - Ch 9

अविनाश पायात चपला घालून पायर्‍या उतरत खाली निघून गेले. समोरच्या वाण्याच्या दुकानात जाऊन ते उभे राहणार तोच त्यांना दुकानात आधीच गीता वहिनी उभ्या असलेल्या दिसल्या. त्यांना पाहून अविनाश जागीच थांबले. जवळच पानटपरीवर शेंडे अन त्यांची टवाळकी मित्रमंडळी उभी होती. दुकानात जाणारे अविनाश आपली दिशा वळवून टपरीकडे निघाले. त्यांना गीता वहिनींसमोर दुकानदाराला दुधासारख्या शूलक गोष्टीसाठी उधार मागणे बरे वाटत नव्हते.

"शेंदर्‍या, तो बघ बोका, इकडेच येतोय, काहीतरी उधार मागणार असं दिसतय." स्कूटरवर बसलेला एकजण अविनाशला उद्देशून बोट दाखवीत शेंडेला म्हणाला.
"ए तू गप्प बैस रे." शेंडे

"काय शेंडे, काय चालू आहे?" अविनाश शेंडेच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले.
"काही नाही साहेब, असच जरा गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या." शेंडे

"तुझं प्रकरण मिटले की नाही अजून?" अविनाश
"तुम्ही जामीन दिल्यानंतर पोलिसांनी सोडून तर दिलंय पण दर दिवसाला पोलिस स्टेशनात हजेरी लावावी लागतेय."
"ठीक आहे, काही मदत लागली तर सांग." गीता वहिनीला दुकानातून बाहेर पडताना पाहून अविनाश म्हणाले.
"नक्की सांगेन साहेब." शेंडेचे वाक्य पूर्ण होण्याच्या आताच अविनाश वळून दुकानाकडे निघाले होते.

"रमन, एक दुधाची थैली दे रे. अन पैसे खात्यात लिहून ठेव. चार तारखेपर्यंत चुकती करेन तुझी उधारी." अविनाश.

"हे बघा, आधीच तुमची उधारी दोन हजार एकशे त्र्याहत्तर झालीय, अन वरुन हे दुधाचे आणखी तेरा रुपये मिळून झाले दोन हजार एकशे सहाऐन्शी."

दूध घेऊन अविनाश वळणार तोच समोरून एक मुलगा धावत त्याच्यापाशी आला. तो अजित-सुजितचा मित्र होता.

"काका,काका..." तो धाप टाकत म्हणाला.
"काय झाले रे असा पळत का आला आहेस. आणि माझ्याकडे असं काय काम आहे तुझं ?" अविनाश

"काका तुमच्या घरीच जाणार होतो, पण तुम्ही इथे दिसलात म्हणून सरळ तुमच्याच कडे आलो"
"अस काय काम काढलस?" अविनाश.

"काका, तुमच्या सुजितला काही माणसांनी गाडीत टाकून पळवून नेले आहे, अजित ही त्यांच्या मागे धावत गेलाय."
"काय???" अविनाश मटकण खाली बसले. त्यांची शुद्ध जवळ जवळ हरपली होती.

क्रमशः

आधीचे पान