Monday, June 27, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch १०. डॉ आल्फ्रेड स्पेंस

द एलिअन टेक्नोलॉजी - ch १०. डॉ आल्फ्रेड स्पेंस

स्फिनिक्स ग्रहाच्या स्पेसस्टेशनच्या एका स्पेसशिपमधून निघालेले ते स्पेसशटल मिल्की वे गॅलेक्सीकडे वेगाने चालले होते. आता ते स्पेसशटल मॅजलॅनिक गॅलेक्सीमधील एका ब्लॅकहोल जवळ आले. 

ब्लॅकहोल हा एका डायमेंशनमधून दुसऱ्या डायमेंशनमध्ये जाण्याचा एक मार्ग आहे हे स्फिनिक्शिअन्सनी आधीच जाणून घेतले होते. प्रत्येक गॅलेक्सीत असे एक ब्लॅकहोल तरी असतेच, जसे ब्लॅकहोल दुसऱ्या डायमेंशन मध्ये जाण्याचा एक मार्ग आहे तसाच तो त्या दुसऱ्या डायमेंशनमधून ह्या डायमेंशनमध्ये येण्याचा ही मार्ग आहे. अश्या ६४ डायमेंशनचा स्फिनिक्शिअन्सनी शोध लावला होता. या डायमेंशन बद्दल माहिती मिळवून, डॉ आल्फ्रेड स्पेंस निरनिराळे शोध करीत होते. त्याचा एक महत्वाचा शोध पूर्ण विश्व बदलू शकणार होता, त्यात ते जवळजवळ  यशस्वी ही झाले होते.

डॉ स्पेंस आपल्या प्रयोग शाळेत काम करीत होते. त्यांच्या टेबलावर एक इलेक्ट्रोनिक नोटपॅड होते, त्यांच्या हातात पेनासारखी एक वस्तू होती. टेबलावर समोरच काही प्रयोगांचे सामान होते. इलेक्ट्रोनिक मशीन्स, चौकोनी काचेची भांडी, लेसर मशीन्स असे वेगवेगळे प्रयोगात लागणारे सामान तेथे होते. 

डॉ स्पेंसनी टेबलावरील इलेक्ट्रोनिक नोटपॅड उचलले अन त्यावर हातातील पेनासारख्या वस्तूने लिहू लागले. ती वस्तू म्हणजे एक लेझर पेन होता. त्यांनी नोटपॅडवर एक फॉर्मुला लिहिला अन पुन्हा नोटपॅड खाली ठेवले. आता ते मागे वळून पाहू लागले. त्यांच्या मागे एक मोठीशी इलेक्ट्रोनिक मशीन होती. त्या मशिनच्या समोरील बाजूस काच लावलेली होती. ती इलेक्ट्रोनिक मशीन एखाद्या मोठ्या मायक्रोवेव मशीन सारखी भासत होती. मशिनच्या आत अति सूक्ष्म असे प्रोटोन्स अन मायक्रोंस ठेवण्यात आले होते.  

डॉ स्पेंसने मशीनचे एक बटन दाबले. मशीनमध्ये असलेली लेझर बीमची उपकरणे आता त्या प्रोटोन्स व मायक्रोन्सवर निशाणा साधून उभी होती. डॉ स्पेंसने अजून एक बटन दाबले. त्या लेझर बीम्स मधून गॅमा, झॉल्टा, क्सेमा अशा प्रकारची निरनिराळी किरणे निघू लागली. काही वेळातच तिथे आग लागून धुराचे लोट निघावेत तसा धूर निघू लागला. काही वेळातच त्या धुरापासून ढग तयार झाला. आता त्या ढगावर प्रक्रिया चालू होती.

२ तास उलटून गेले होते. ढगाचे रुपांतर आता एक गोल काळ्या द्रव पदार्थात झाले होते. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार त्या द्रव पदार्थाला मशिनच्या आतील पृष्ठ भागावर पसरले पाहिजे होते, या उलट ते हवेत इकडून तिकडे उडत होते. तो पदार्थ इकडून तिकडे उडत असताना तो स्वतःभोवती ही फिरत होता, जणू एक छोटी पृथ्वीच परिवलन आणि परिभ्रमण या दोन्ही क्रिया करीत असावी. हळूहळू तो द्रव पदार्थ एका विशिष्ट लयबद्ध पद्धतीने फिरू लागला. 

डॉ स्पेंस त्या पदार्थाच्या क्रियेकडे लक्ष्य देऊन निरीक्षण करत होते. ते अगदी मशिनच्या काचे जवळ जाऊन पाहू लागले. त्यांच्या नजरेत काही तरी आले होते. तो एक अतिसूक्ष्म असा पाऱ्यासारखा दव बिंदू होता. काळा द्रव पदार्थ खरेतर याच पदार्थाभोवती प्रदक्षिणा घालत होता. तो कदाचित त्यापृथ्वीचा सूर्य असावा. डॉ स्पेंसने गती वाढवण्यासाठी असलेले बटन दाबले, तशी त्या द्रव पृथ्वीने सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याची आपली गती वाढवली. गती वाढवल्यामुळे त्या द्रव पृथ्वीच्या कक्षेत फरक पडला ती आता त्या सूर्याच्या अगदी जवळून फिरू लागली. डॉ स्पेंसने पुन्हा गती वाढवली आता पृथ्वीच्या लयबद्धतेत फरक पडला ती कधी सूर्याच्या एकदम जवळून जाई तर कधी दुरून. असे करता करता पृथ्वी त्या सूर्याला जावून थडकली. पाण्यात जसा टोरपॅडो मिसाईल आपल्या निशाण्यावर जावून स्फोट करतो तसा स्फोट झाला. पृथ्वीचे द्रवावरण छिन्नविछिन्न झाले, पृथ्वी छोट्या छोट्या भागात विभागली गेली. त्या ही परिस्थितीत त्या भागांचे सूर्याभोवती फिरणे चालूच राहिले. हळूहळू त्या भागांनी सूर्याभोवती आवरण निर्माण केले. ते पदार्थ पुन्हा एकरूप झाले यात सूर्य त्यांचा केंद्र बिंदू बनला. 

डॉ स्पेंसने गती वाढवली. नवीन निर्माण झालेल्या द्रव पदार्थाने स्वतःभोवती फिरणे चालू ठेवले होते. फिरता फिरता या पदार्थामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण होवू लागली. डॉ स्पेंस ने यावेळेस पाच पटीने गती वाढवली. त्या पदार्थाची गुरुत्वाकर्षण शक्ती एवढी वाढली कि प्रक्रियेत निर्माण झालेले अन्य पदार्थ जे इतरत्र पडले होते त्यांना तो स्वतःकडे खेचून आपल्यात सामावून घेत होता.

डॉ स्पेंसच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. त्यांनी एक छोटा कृत्रिम ब्लॅकहोल तयार केला होता. त्यांनी टेबलावरील नॊटपॅड पुन्हा उचलले अन त्यावर पूर्ण प्रक्रियेची नोंद केली. आता त्यांनी मशीनचे अजून एक बटन दाबले. ती मशीन आता त्या ब्लॅकहोलवर पुन्हा प्रक्रिया करू लागली होती.

इतक्यात डॉ स्पेंसची असिस्टन्ट धावत प्रयोग शाळेत शिरली. ती तरुण मुलगी फारच घाबरलेली दिसत होती.
"क्षिना, तू फारच घाबरलेली दिसतेस. काय झाले मला सांग." डॉ स्पेंसने क्षिनाला विचारले.
"डॉक्टर, आपल्याला इथून लवकरच निघावे लागेल. तुमचा जीव धोक्यात आहे". क्षिना
"काहीही वेड्या सारखे बडबडू नकोस." डॉ स्पेंस
"डॉ स्पेस सेंटर मधील प्रयोग शाळेतून प्रयोगाचे पदार्थ आणताना तिथल्याच जवळच्या मीटिंग रूम मध्ये चाललेल्या मिलिटरी मीटिंग मी चोरून ऐकली आहे."
"काय अन तू हे सगळे केलंस,पण कश्यासाठी?"
"डॉक्टर तिथे कमांडर ग्रेगर म्हणत होता कि वरून ऑर्डर आली आहे. डॉ स्पेंसचे प्रयोग संपल्यावर, आपल्याला त्यांनाही संपवायचे आहे, तेही अगदी चुपचाप कोणालाही खबर न होता."
"डॉक्टर तो पुढे म्हणाला कि त्याच्या प्रयोगापासून जे तंत्रज्ञान मिळेल त्याला पुढे विकसित करून आपण एक विध्वंसक यंत्र बनवणार आहोत. यात डॉक्टर स्पेंस अडथळा निर्माण करेल, त्याआधीच त्याला संपवायचे आहे."

"डॉ तुम्हाला लवकरात लवकर हा ग्रह सोडून निघावे लागणार आहे. माझ्या माहिती नुसार मिल्की वे गॅलेक्सीत पृथ्वी नावाच्या ग्रहावर जीवन आहे. त्या ग्रहावर आपल्या ग्रहासारखे वातावरण असण्याची शक्यता आहे. मी सुद्धा हा ग्रह सोडण्याची तयारी करत आहे. तुम्ही पुढे निघा." 

मशीनने ब्लॅकहोलवर प्रक्रिया करून एक घनत्व असलेला पदार्थ तयार केला होता. डॉ स्पेंसने मशीन बंद केली व तिचा दरवाजा उघडला. आतील पदार्थ त्यांनी एका मोठ्या चिमठ्याने उचलून काचेच्या बंद डब्यात ठेवला. तो डब्बा त्यांनी आपल्या कवचाच्या कप्प्यात ठेवला. डॉक्टर स्पेंसने हातातील नॊटपॅड कवचाच्या दुसऱ्या कप्प्यात ठेवले.आता एका क्षणाचाही विलंब न करता ते व क्षिना दोघे ही धावत प्रयोगशाळेबाहेर पडले.   

स्पेसशटलला लागणाऱ्या दचाक्यामुळे क्षिना भूतकाळातून वर्तमान काळात आली. तिला पाच वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टींचे स्मरण होत होते.स्पेसशटलला बसणारे धक्के वाढले होते. त्याधक्क्यांचे कारण होते समोरचे ते ब्लॅकहोल. 

ब्लॅकहोल स्पेसशटलला आपल्याकडे ओढून घेत होते. काही वेळातच त्या स्पेसशटलला ब्लॅकहोलने आपल्यात सामावून घेतले.

क्रमशः 

Saturday, June 25, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ९. क्षिना आणि एलेक्सची भेट

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ९. क्षिना आणि एलेक्सची भेट 

एलेक्स गाडी वेगाने चालवत होता त्याला लवकरात लवकर टेकडी मागे पोहचायचे होते. स्टेफनी अन एलेक्सच्या मते टेकडी मागे जंगल असावे, तिथे वणवा पेटला असावा. एलेक्स बहुदा जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी गाडी वेगाने हाकत होता. पाण्याने भरलेले कॅन्स ही त्यासाठीच गाडीत ठेवले होते.

गाडी आता टेकडीपाशी आली होती पुढे वळण होते. तो रस्ता टेकडीच्या मागे नेत होता. गाडी वळणावर वळते न वळते तोच समोरून एक सुंदर मुलगी चालत आडवी आली. एलेक्सने जोरात ब्रेक दाबला. ब्रेक दाबल्या दाबल्या गाडी दचके खात जागेवर उभी राहिली. जॉन बसलेल्या धक्याने रागावून एलेक्सकडे पाहत म्हणाला.
"हि काय पद्धत झाली गाडी चालवण्याची. तुला गाडी चालवता येत नसेल तर मी चालवतो आण".
एलेक्सने त्या तरुणीकडे उजव्या हाताचे बोट दाखवत जॉनला तिच्या उपस्थितीची जाणीव करून दिली.

"अहो मॅडम, तुम्हाला मरायचेच असेल तर दुसऱ्या कोणाची तरी गाडी शोधा, पण आमची वाट सोडा" 

जॉन तिला रागात भलते सलते बोलू लागला. तशी तिने गाडीला वाट करून दिली, पण चालता चालता तिने एक जळजळीत कटाक्ष जॉनकडे टाकला. जॉन हि तिच्याकडेच बघत होता, तिच्या नजरेशी नजर भिडताच त्याच्या शरीरातून एक भयाची लहर येऊन गेली. त्याने आपली नजर हटवून एलेक्सकडे पहिले. एव्हाना एलेक्सने तिथून गाडी हालवली होती.

"एलेक्स, ती मुलगी जरा विचित्र वाटत होती. नाही?" जॉन.
"नाही बुवा, मला तसे काही वाटले नाही." एलेक्स म्हणाला.
"अरे तिच्या हातात न काही तरी अजब प्रकारचे वॉच होते. दुसऱ्या हातात तर मला सुरा असल्यासारखे वाटले." जॉन .
"मला वाटते, तुझी रात्रीची अजून उतरली नाही, हो कशी उतरेल सहा - सात बॉटल घेतल्यावर?" एलेक्स टोमणा मारत म्हणाला.
"हं, काय म्हणालास सहा - सात बॉटल! तुला कोणी सांगितले?" जॉन 
"कोणी कशाला सांगायला हवे मी स्वतः पाहिलंय, त्या तिथे मक्याच्या शेतात" एलेक्स जॉनची मस्करी करत म्हणाला.

"कोणाला सांगू नको प्लीज, तिथे काय घडले ते." जॉन ओशाळत म्हणाला.
"ठीक आहे नाही सांगणार." असे म्हणत एलेक्सने पुढे नजर टाकली. समोरचे दृश्य पाहून त्याच्या तोंडातून नकळत शब्द निघाले. 
"ओह माय गॉड." 

ती दोघे आता टेकडीमागे पोहचली होती. समोरच जमिनीवर मोठा खड्डा पडलेला होता, जणू एखादे आटलेले छोटे तळे असावे. त्याच्या आजूबाजूला आगीच्या ठिणग्या पसरलेल्या होत्या. सभोवतालची झाडे मोडून पडली होती अन त्यांना आग हि लागली होती. एलेक्स पटकन उतरला, गाडीच्या मागच्या बाजूस ठेवलेल्या कॅन्स मधून एक उचलून तो त्या झाडांकडे धावू लागला. कॅन्समधील पाण्याच्या मदतीने तो लागलेली आग विझवू लागला. त्याला तसे करताना बघून जॉनही त्याची मदत करण्यास धावला. 

सगळी आग विझवून झाली, एलेक्स त्या खड्ड्याजवळ उभा राहून त्याचे निरीक्षण करीत होता.
"कशामुळे लागली असावी हि आग" जॉन मागून चालत येत एलेक्सच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
"माझ्या मते इथे एखादी वीज पडली असावी, ह्या दिवसात वीज पडणे हे कॉमन आहे. नाही का?" एलेक्स 
"हो तसेच असेल बहुतेक. चल आता निघायला हवं". जॉन 

एलेक्स, जॉन दोघे गाडीत बसले. जॉनने गाडी वळवली अन घराच्या दिशेने हाकली. या वेळेस जॉन गाडी चालवत होता.

जॉनने गाडी मुद्दामच घरासमोर दारात उभी केली. गाडीचा आवाज ऐकून स्टेफनी अन बेला धावत बाहेर आल्या.
जॉन - एलेक्स गाडीतून उतरून त्यांच्या दिशेने चालत होते. स्टेफनीने एलेक्सला करकचून मिठी मारली. तर जॉनने स्वतःच जवळ उभ्या असलेल्या बेलाला आणखी जवळ ओढत आपल्या मगरमिठीत सामावून घेतले.

बेला जॉनच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका करून घेण्याची धडपड करीत असताना जॉनचे लक्ष्य दाराकडे गेले. तो जोरात ओरडला
"अरे हि तीच मुलगी."

एलेक्सने वळून पहिले. दारात मघाशी रस्त्यात भेटलेली मुलगी दाराला टेकून उभी होती. ती क्षिनाच होती...

क्रमशः


Thursday, June 23, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ८. एन्ट्री ऑफ क्षिना

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ८. एन्ट्री ऑफ क्षिना

एलेक्स, जॉन अन बेला स्टेफनीला घेऊन घराच्या दिशेने फिरले न फिरले तोच समोरचे दृश्य पाहून ते सारे जागच्या जागीच थबकले. घराच्या मागे जी टेकडी दिसत होती तिच्या जवळून धुराचे लोटच्या लोट आकाशाला भिडत होते, जणू काही एखाद्या जंगलात वणवा उठावा अन त्याच्या धुराचे लोट आकाशातील ढगांशी स्पर्धा करीत असावे.

"व्हाट द एफ..." जॉनच्या तोंडातून आश्चर्याचे सूर निघाले.
"जॉन, तू काय बोललास? माइण्ड युअर लॅन्ग्वेज." बेला जॉनला दटावत म्हणाली. "मला वाटते त्या टेकडीतून ज्वालामुखी बाहेर पडला असावा.
"आर यु डम्ब? तु मतिमंद आहेस का? टेकडीतून कधी ज्वालामुखी निघतो का?" जॉन बेलाला तुच्छतेने हिणवत म्हणाला. 
"यु गायीझ, बोथ ऑफ यु प्लीज स्टॉप इट." एलेक्स वैतागून म्हणाला.
"एलेक्स त्या तिकडे, टेकडीपलीकडे बहुतेक जंगल असावे. अन त्या जंगलात वणवा पेटला असावा." स्टेफनीने आपले मत मांडले.
"तसे असेल बहुतेक" एलेक्स.

"अच्छा स्टेफनीने बोलले तर चालते ह्यांना, आणि आमचे काय?? टोचते???" जॉनने एलेक्सला डिवचण्याचा प्रयत्न केला.
"ती माझी गर्ल-फ्रेंड आहे, तु नव्हे" एलेक्स.  
"मलाही काही मुलांमध्ये इंटरेस्ट नाही आहे." जॉन बेलाच्या कमरेत दोन्ही हात टाकून तिला जवळ ओढत खट्याळपणे म्हणाला,"मला तर फक्त मुली आवडतात."

बेलाने जॉनच्या छातीवर मुष्टी प्रहार करत स्वतःला सोडवून घेतले. ती आता जॉन पासून दूर जात कधी समोरील दृश्याला बघत होती तर कधी जॉनच्या खट्याळ नजरेला नजर भिडवून त्याला चिथवत होती.

एव्हाना सकाळचे ८ वाजले होते. एलेक्स जवळच्या तळ्यातून पाणी भरून आणलेले १०-१० लिटरचे कॅन्स गाडीत भरत होता. जॉन घराच्या अंगनात बसून आपल्या राईफलला साफ करीत होता. बेला अन स्टेफनी खाण्या-पिण्याचे सामान एका बागेत पॅक करीत होत्या.

एलेक्सने टेकडीपलीकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा जॉन एलेक्ससोबत जाण्यास तयार नव्हता, पण जेव्हा स्टेफनी त्याच्याऐवजी जाण्यास तयार झाली, तेव्हा त्याच्यातील पुरुषी अहंकार जागा झाला.त्याने स्टेफनीस थांबवले अन तो जाण्यास तयार झाला.

८:२० ला एलेक्स आणि जॉन गाडीत बसून टेकडीकडे जाण्यास निघाले. एलेक्सने स्टेफनी व बेलाला सोबत घेण्यास मनाई केली होती म्हणून त्या दोघीही घरात थांबल्या होत्या. एलेक्सच्या गाडीने तळ्यावरचा छोटा लाकडी पूल पार केला होता अन ती आता रस्त्याला लागली होती.

टेकडीपलीकडे....

जिथे तो उल्कापिंड पडला होता ती जागा म्हणजे टेकडीच्या पायथाशी असलेले एक छोटे जंगलच होते. जंगलाच्या सुरुवातीची झाडे मोडून पडली होती. इतरत्र आगीच्या छोट्या-मोठ्या ठिणग्या पसरल्या होत्या. उल्कापिंडाच्या आजूबाजूने धुराचे लोट निघत होते.

उल्कापिंड एक मोठ्या गोलाकार चेंडूसारखा भासत होता, त्याच्या पृष्टभागावरून आगीच्या ठिणग्या उडत होत्या. अचानक फस्श असा आवाज झाला.

उल्कापिंड अर्ध्या मधून दुभंगू लागला. उल्कापिंडाचा ऊर्ध्वभाग एखाद्या लग्झरी कन्व्हर्टेबल कारच्या छताप्रमाणे उघडला गेला. त्यामधून मानवांप्रमाणे अवयव असणारा प्राणी खाली उतरला. 

तो उल्कापिंड नव्हताच मुळी, ते एक स्पेस शटल होते. तो प्राणी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून एक स्फिनिक्शिअन होता, एक एलिअन.

स्फिनिक्शिअन दिसायला मानवाप्रमाणेच होता, म्हणजे त्याला दोन हात, दोन पाय ,दोन कान, दोन डोळे, एक नाक, आणि एक मोठे मस्तक होते. अवयव माणसांप्रमाणेच पण त्यामध्ये ही प्रचंड असमानता होती. दोन्ही हाताना चारच बोटे, पायानाही चार बोटे पण पाय एखाद्या जंगली प्राण्यांप्रमाणे. डोळे म्हणजे नुसते मोठे काळे बुबुळ. डोके एखाद्या बल्बच्या आकारासारखे. त्वचा एखाद्या न तुटणाऱ्या फायबरच्या पदार्थासारखी, अन तिचा रंग गोरा अगदी आगीतून होरपळून निघालेल्या मनुष्याच्या कातडीसारखा, बर्फाळ प्रदेशात राहणारा एखादा गोऱ्या माणसाने ही त्याच्या रंगाचा हेवा करावा असा. त्याच्या तुळतुळीत त्वचेवरून प्रकाश परावर्तीत होत होता अन त्यामुळे तो एखाद्या देवतेप्रमाणेच भासत होता.

त्या स्फिनिक्शिअनने अंगावर अत्यंत वेगळ्या प्रकारचे कपडे चढवली होती, ती कपडे जणू महाभारत कालीन योध्यांची शरीर रक्षणार्थ घालण्यात येणारी कवच असावी असे वाटत होते. त्याच्या हातात अनोखे घड्याळ बांधले होते. त्यावर लाल रंगात स्फिनिक्शिअन भाषेत काही आकडे चमकत होती. त्याने त्या आकड्याखाली असलेले एक छोटे बटन दाबले. 

उल्कापिंड फास्स - फसस असा आवाज करीत छोटा होवू लागला. तो चेंडूच्या आकारा इतका छोटा झाला. हळूहळू तो रंग ही बदलू लागला. तो एका धगधगत्या गोळ्यापासून एका क्रिकेटच्या चेंडूत रुपांतरीत झाला होता. त्या स्फिनिक्शिअनने तो चेंडू उचलला अन आपल्या कवचाच्या कप्यात ठेवून दिला. आता तो स्फिनिक्शिअन वळून टेकडीच्या मागच्या दिशेने चालू लागला. त्याच्या पाठीवर , कवचावर सुवर्णाने एलिअन भाषेत काहीतरी लिहिले होते.

चालता चालता त्या स्फिनिक्शिअनने पुन्हा हातातील उपकरणावरील अजून एक बटन दाबले. आता तो स्फिनिक्शिअन ही रूप बदलू लागला होता. त्याने एका (मानवीय) तरुणीचे रूप घेतले होते. कपडेही बदलले होते, त्या तरुणीने काळ्या रंगाचे टी-शर्ट अन ब्लू जीन्स घातली होती. तिच्या टी-शर्टवर मागील बाजूस सुवर्ण अक्षरात काही लिहिले होते- XINA (क्षिना). 


क्रमशः 

Wednesday, June 22, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ७. मॅजलॅनिक गॅलेक्सी

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ७. मॅजलॅनिक गॅलेक्सी

मिल्की वे आकाशगंगेपासून १६०,००० प्रकाश-वर्षे दूर मॅजलॅनिक गॅलेक्सीतील पृथ्वीसारख्या स्फिनिक्स (EVS160) ग्रहावर... 

काही स्पेसशिपस स्पेसस्टेशनवर लॉन्चसाठी उभी होती. जवळच लागून असलेल्या स्पेस-सेंटरच्या मोठ्या हॉलमध्ये स्फिनिक्शिअन्सची एक मीटिंग चालू होती. मीटिंगमध्ये १६ जणांचा सहभाग होता. त्यातील एक जण सगळ्यांना काय व कसे करायचे याबद्दल ऑर्डर देत होता. तो बहुदा त्या सर्वांचा कमांडिंग ऑफिसर असावा. सगळे जण आता एका गोल टेबलासारख्या वस्तुजवळ गोल रिंगण करून उभे होते. कमांडिंग ऑफिसर सगळ्यांना त्या टेबलावरील नकाशावर हातातल्या लेझर किरणाने निर्देशून मार्गदर्शन करीत होता. ती वस्तू म्हणजे इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इन्टर गॅलेक्टीक स्पेस मॅप (EMIGSM) होता. 

कमांडिंग ऑफिसर बोलत होता.
एलिअन भाषेत...




मित्रांनो,
आपण गेल्या ५ वर्षांपासून डॉ. आल्फ्रेड स्पेंस आणि त्यांच्या असिस्टन्टला शोधत आहोत. आपण त्यांना आपल्या गॅलेक्सीमध्ये शोधून पहिले आहे परंतु ते आपल्याला सापडले नाहीत, अन याचाच अर्थ असा होतो कि ते आपल्या गॅलेक्सीत नाहीत.

आपल्याला मिशन डॅकसाठी (DAK) वरून ऑर्डर्स आल्या आहेत. या मिशनसाठी आपण निवडले गेलो आहोत. आपल्याला ७७:१८३ वाजता शोध मोहिमेवर वेगवेगळ्या गॅलेक्सीत जायचे आहे.

डॉ. आल्फ्रेड स्पेंस आणि त्यांच्या असिस्टन्टला जगण्यासाठी आपल्या ग्रहाच्या वातावरणासारखे वातावरण हवे आहे.म्हणून आपले काम सोपे झाले, आपल्याला फक्त असे ग्रह शोधायचे आहेत की जिथले वातावरण आपल्या वातावरणासारखे असेल.बस्स! त्या ग्रहावर जावून आपल्याला डॉ. आल्फ्रेड स्पेंस आणि त्यांच्या असिस्टन्टला शोधायचे आहे. आपण सुरुवात ट्रियांगुलम गॅलेक्सी व एंड्रोमेडा गॅलेक्सी पासून करू या. ८  जणांचा गट ट्रियांगुलम गॅलेक्सीकडे जाईल व उरलेले ८ जण एंड्रोमेडा गॅलेक्सीकडे जातील. 

कमांडर सर्व जणांना पोर्टेबल इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इन्टर गॅलेक्टीक स्पेस मॅप (PEMIGSM) देत विविध सूचना करीत होता.हे सर्व घडत असताना त्या रुमच्या दरवाज्या आडून कोणीतरी लपून सगळे ऐकत होते आणि याची जाणीव आतल्या सदस्यांना नव्हती.

अजून ७७ वाजायला ४ तासांचा अवधी होता. कमांडरने सर्व सदस्यांना आपापली सामाने अन साहित्ये भरून घेण्याची ऑर्डर दिली. सर्व जण पळत त्या रूम बाहेर निघाले अन आपआपल्या केबिनकडे जाऊ लागले.

७५: ९७ वाजता स्पेस स्टेशनच्या एका स्पेसशिपमधून एक गोलाकार स्पेसशटल मिल्की वे गॅलेक्सीकडे निघाले होते...

क्रमशः 

Note: स्फिनिक्स हा ग्रह मिल्की वे या आपल्या आकाशगंगेपासून १६०,००० प्रकाश-वर्षे दूर असलेल्या मॅजलॅनिक गॅलेक्सीत असणारा एक ग्रह आहे. या ग्रहावर स्फिनिक्शिअन्स नावाची प्रजाती राहत आहे. ह्या ग्रहावर ५ वर्षे म्हणजे पृथ्वीवरील पन्नास वर्षे. यांच्या १ वर्षात ४८७ दिवस असतात अन दिवसाचे १७९.८७ तास असतात. हि प्रजाती / एलिअन मानवापेक्षा अधिक प्रगत आहेत. वाचकांनी लक्ष्यात घावे की  हे सर्व काल्पनिक आहे. वैज्ञानिकानी फक्त मॅजलॅनिक गॅलेक्सी अस्तित्वात असल्याची पुष्टी केली आहे. 


Previous / Next

Monday, June 20, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ६. पूर्वभाग - डॉ जोन्सचा सिक्रेट मेसेज

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ६. पूर्वभाग - डॉ जोन्सचा सिक्रेट मेसेज 

एक ब्लॅक कलरची ओल्ड GMC SAFARI पूर्व कॅनडाच्या दिशेने धावत होती. रस्ता सुनसान होता, रस्त्याच्या दुतर्फा जंगलही होते. पावसाची रिमझिम धारा आकाशातून कोसळत होत्या. अशातच एलेक्स ड्राइव करत होता. अधून - मधून डेस्क बोर्ड वरील बटन दाबून एलेक्स विंडस्क्रीन वाईपरने साफ करीत होता.

"एलेक्स, आपण कुठे चाललो आहोत?", एलेक्सच्या बाजूच्या सीटवर बसलेली स्टेफनीने विचारले.
"हम्म." एलेक्स आपल्याच धुंदीत गाडी चालवत होता.
" ए एलेक्स सांग ना रे." स्टेफनी लाडवत म्हणाली.
"काय सांगू ?" एलेक्स.
"हेच कि आपण कुठे चाललो आहोत ते."स्टेफनी.
"अरे सांगून टाक ना एकदाचं, तिची कटकट तरी मिटेल." मागच्या सीटवर बसलेला जॉन वैतागून म्हणाला.
"मी सांगितले होते ना तुला आधीच" एलेक्स गाडीवरून लक्ष्य न हटवता म्हणाला.
"काय सांगितले होतेस?" आता बेलाने न राहवून प्रश्न केला.
"अरे आपण माझ्या ग्रॅन्डफादरच्या घरी चाललो आहोत."
"पण कुठे?" स्टेफनीचा उतावीळपणा तिच्या प्रश्न वरून दिसून येत होता.
"पूर्व कॅनडातील एक छोट्या गावात, इस्ट-आल्डफिल्ड मध्ये."
"बरे झाले मी हे बिअरचे बॉक्स घेवून आलो ते, नाहीतर त्यागावात कुठे मिळणार आहे बिअर वगैरे?" जॉन फुशारक्या मारीत म्हणाला.

इस्ट-आल्डफिल्ड मधील पोलीस स्टेशन मध्ये...
एका लाकडी खुर्चीवर डिटेक्टीव एन्ड्रू ब्लान्क बसला होता. समोरील टेबलावर काही फाईल्स विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या होत्या. त्या टेबलासमोर अजून दोन रिकाम्या खुर्च्या ठेवल्या होत्या. डिटेक्टीव ब्लान्क एक फाईल घेवून मोठ्या बारीकीने कसले तरी अध्ययन करत होता.इतक्यात...

इतक्यात एक ब्लॅक कलरची ओल्ड GMC सफारी पोलीस स्टेशनच्या आवारात येवून थांबली. करकचून दबलेल्या ब्रेक मुळे झालेल्या आवाजाने ब्लान्क चे लक्ष्य ओढून घेतले. गाडीतून दोन सुंदर तरुणी अन दोन तरुण उतरून त्याच्याच दिशेने चालत येत होते. चौघे जवळपास २३-२५ वयोगटातील असावेत असा ब्लान्क ने अंदाज बांधला. दोघी तरुणी फारच सुंदर होत्या, एकीचे केस कुरळे होते डोळ्यावर बारीक काडीचा चष्मा, व्हाईट शर्ट व त्यावर ब्राऊन कलरचे जॅकेट अन ब्लॅक कलरची स्कीन फिटिंग जीन्स असा तिचा पेहराव होता, तर दुसरीने रेड कलरचा हलका पारदर्शी स्ट्रॅपलेस मिनी ड्रेस घातला होता. त्या ड्रेस मधून तिच्या भरीव अंगाचे प्रदर्शन होत होते. तिचे गुलाबी रसाळ ओठ अन तिचे काळे केस तिचे सौंदर्य वाढवत होते. तिने ब्लॅक कलरचा गॉगल घातला होता. 

"मी एलेक्स ब्लडगुड, डॉ जोन्स माझे  ग्रॅन्ड्फादर आहेत." व्हाईट शर्ट अन ब्लू जीन्स घातलेला तरुण ब्लान्क कडे शेकहॅन्डसाठी हात पुढे करीत म्हणाला.
"अच्छा, मी डिटेक्टीव ब्लान्क" ब्लान्क एलेक्सशी शेकहॅन्ड करीत म्हणाला."अन हे?"
"मी जॉन, एलेक्सचा मित्र." ग्रीन टी-शर्ट अन ब्लू जीन्स घातलेला युवक उतरला.
"हि स्टेफनी" एलेक्स रेड कलरचा हलका पारदर्शी स्ट्रॅपलेस मिनी ड्रेस घातलेल्या युवतीकडे बोट दाखवीत म्हणाला. 
"अन मी बेला." बेला आपली ओळख दाखवत म्हणाली.

"एलेक्स, बॉडी पोस्ट-मार्टम साठी पाठवली आहे. उद्या सकाळी तुम्ही ती पाहू शकता." ब्लान्क सरळ मुद्द्याकडे वळत म्हणाला.
"ठीक आहे, मग आम्ही उद्याच येवू." एलेक्स 
"ह्या आहेत जोन्सच्या घराच्या किल्ल्या. अन ही डायरी, आम्हाला जोन्संच्या घराची झडती घेताना सापडली. त्यात त्यांनी काही प्रयोगांचे नोटस लिहून ठेवले आहेत." ब्लान्क.

डॉ. जोन्सच्या घरी...
एलेक्स लाकडी आराम खुर्चीवर झोके घेत बसला होता. समोरच सोफ्यावर स्टेफनी व बेला बोलत बसल्या होत्या. जॉन कोपऱ्यातील खिडकीच्या ओट्यावर हातात बिअरचा कॅन घेऊन बसला होता. तो अधून मधून बिअरचे छोटे-छोटे सिप घेत होता.

"काय एलेक्स यार कुठे आणले आहेस आम्हाला?" जॉन तोंड वेडे-वाकडे करत म्हणाला.
"एकाच दिवसाचा प्रश्न आहे. तू जरा धीराने घे ना." बेला.

एलेक्स जागेवरून उठला, त्याच्या चेहऱ्यावर विचारांचे सावट पसरले होते. तो सरळ चालत गेला अन एका टेबलाजवळ जाऊन उभा राहिला. त्या टेबलावर डॉ जोन्सची डायरी ठेवली होती, एलेक्सने ती उचलली अन पुन्हा   त्या आराम खुर्चीवर जावून बसला. आता तो त्या डायरीची पाने चाळत बसला, प्रत्येक पानावर डॉ. जोन्सने काही प्रयोगांचे नोटस लिहिले होते. शेवटच्या पानावरही काही नोटस लिहिले होते, तारीख होती ९ दिवसांपूर्वीची, त्या दिवसापासूनच डॉ. जोन्स गायब झाले होते. एलेक्स ते पान बारीकीने पाहत होता.

"ओह, माय गॉड." एलेक्स आश्चर्याने ओरडला. "स्टेफ यु हॅव टु सी धिस."
जॉन, स्टेफनी, आणि बेला धावतच एलेक्सपर्यंत पोहचले होते. एलेक्सने पाय ठेवायचा स्टूल जवळ ओढून घेतला.आता त्याने हातातील डायरी त्या स्टुलावर ठेवली. अन जॉन कडे पाहत म्हणाला.
"जॉन तुझी पेन्सिल दे." 
जॉन एक आर्टिस्ट होता, तो नेहमी ड्रॉइन्ग काढण्यासाठी जवळ एक पेन्सिल अन ड्रॉइन्ग बुक बाळगत असे. जॉनने आपली पेन्सिल बागेतून काढून एलेक्सला दिली.एलेक्स पेन्सिल घेऊन डायरीच्या पानावर वाकड्या तिकड्या रेषा काढत बसला होता.

"हे बघा, या इथे माझे नाव लिहिले आहे." एलेक्स पानावर काढलेल्या रेषेकडे बोट दाखवत म्हणाला.
त्याने पहिल्या पॅराग्राफच्या प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर त्याने एका रेषेने जोडले होते. त्यापासून एक वाक्य तयार होत होते. "एलेक्स, यु मस्ट टू रीड धिस."

जॉनच्या तोंडातून अस्पष्ट शीळ निघाली, तो म्हणाला." एलेक्स, हि लेफ्ट अ सिक्रेट मेसेज फॉर यु."
"यु आर अ‍ॅब्सोलुटली राईट", एलेक्स म्हणाला, "आता हे बघ."
एलेक्स पुन्हा त्या पानावर रेषा ओढू लागला. आता ह्या वेळेस त्याने प्रत्येक ओळीच्या शेवटचे अक्षर जोडून एक मेसेज तयार केला.

"Find your Father. His life is in danger. Alie..."

इतकाच मेसेज डॉ. जोन्स लिहू शकले होते. पुढील पॅराग्राफ अर्धवट लिहिला गेला होता. एलेक्स विचारात बुडून गेला.

डॉ. जोन्सचे काय झाले असावे? माझ्या वडिलांचा याच्याशी काय संबंध? ते आता सध्या कुठे असतील? त्यांचा जीव कशा मुळे धोक्यात आहे? आणि हे Alie काय आहे???.

क्रमशः

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ५. पूर्वभाग - एन्ड्रू ब्लान्कचे लेटर

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ५. पूर्वभाग - एन्ड्रू ब्लान्कचे लेटर
   
बेडवर एलेक्स पालथा झोपला होता. अचानक जवळच्या डिजीटल अलार्म क्लॉक मध्ये सकाळच्या ८ चा गजर वाजू लागला. एलेक्सने झोपेतच अलार्म क्लॉकच्या टॅबवर जोरात हात मारला, तसे ते क्लॉक खाली पडले. अलार्म बंद होण्या ऐवजी आता अलार्मचा कर्कश असा आवाज येवू लागला. शेवटी एलेक्सने वैतागून क्लॉकचा प्लग सॉकेट मधून खेचून काढला. अलार्म बंद झाला अन एलेक्स पुन्हा झोपण्यासाठी कुशीवर वळला.

टिंग ऽ टोंग!!!
कोणीतरी दरवाज्याची बेल जोरात दाबली होती. पुन्हा झोपण्यासाठी कुशीवर वळलेला एलेक्स आता मात्र वैतागून बेडवरून उठला अन बेडरूम मधून बाहेर जाऊ लागला.

"काय कटकट आहे सकाळी-सकाळी. हा जॉन ना! ना स्वतः झोपत ना दुसऱ्याला झोपू देतो. याला आज चांगलाच धडा शिकवतो." एलेक्स आपल्याच मनाशी पुटपुटत दरवाजा खोलण्यासाठी दरवाजाकडे गेला.

"जॉन, कशाला सकाळी सकाळी त्रास देतोयस?" एलेक्स दरवाजा खोलतच म्हणाला.
दरवाजात कोणीच नव्हते.एलेक्स डोळे चोळत बाहेर आला त्याने इकडे तिकडे नजर फिरवीत बघितले. बाहेर जोग्गिंग करणारे, सायकलिंग करणाऱ्या शिवाय त्याला कोणीच दिसले नाही. त्याने पुन्हा वळून लॉनवर नजर फिरवली. कोणीच दिसले नाही म्हणून एलेक्स वळून रूम मध्ये जावू लागला, दारात काही लेटर्स पडली होती.

एलेक्स आता हॉलमधील डायनिंग टेबलवर बसून एक-एक लेटर्स वाचू लागला. पहिले लेटर सेंट - लुईस चर्चचे होते. त्यातील लिहिलेल्या मजकुरानुसार ते लेटर चर्चचे फादर जॉर्ज विल्लीयम (George William) यांनी एलेक्सला त्याने दिलेल्या आर्थिक सहाय्यासाठी थॅन्क्स गिविंग लेटर लिहिले होते. दुसरे लेटर एका बँकेचे होते, त्या अनुसार एलेक्सला लोन चुकवण्याची मुदत अजून सहा महिन्यांसाठी वाढवून मिळाली होती. आणि तिसरे लेटर होते ते एका पोलीस अधिकाऱ्याचे.

एलेक्सने ते लेटर पुन्हा निरखून पहिले. लेटर वर नाव तर त्याचेच होते, अ‍ॅड्रेस पण तोच होता. पण त्याला एका कॅनेडीयन पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला पत्र पाठवावे याचेच आश्चर्य वाटत होते. त्याने पुन्हा लेटर पहिले, त्यावर कॅनेडीयन पूर्व विभागीय पोस्टल स्टॅम्प होता. एलेक्सची उत्सुकता वाढू लागली होती. त्याने क्षणाचाहि विलंब न करता ते पत्र फोडले अन तो वाचू लागला.

सर, 
तुम्हाला कळवण्यात येते आहे कि तुमचे ग्रॅन्ड फादर डॉ. फ्रांक्लीन जोन्स गेले सहा दिवस आपल्या घरातून बेपत्ता आहेत. आम्हाला द क्रोकोडाइल रिवरच्या किनाऱ्यावर एक डेड-बॉडी सापडली आहे. या शवाचे मस्तक आणि पाय मगरींनी खाल्यामुळे, शवाची ओळख करण्यात येत नाही आहे. तरी आम्हाला हे शव डॉ. फ्रांक्लीन जोन्स यांचे असावे अशी शक्यता वाटत आहे. कृपया शवाची शहनिशा करण्यासाठी आपण यावे.

André Blanc
RCMP, Canada
  
क्रमशः